breaking-newsमहाराष्ट्र

उस्मानाबाद जिल्ह्यात आमदार संवाद मंच दिशादर्शक ठरेल – मृणालिनी जोग

  • उपक्रम राबविणारा उस्मानाबाद हा राज्यातील एकमेव जिल्हा
  • चार विधानसभा मतदार संघात आमदार संवाद मंच कार्यरत

तुळजापूर | महाईन्यूज | प्रतिनिधी

राज्यातील मानव निर्देशांक कमी असणाऱ्या जिल्ह्यात युनिसेफशी संलग्न असणारी मुंबईतील संपर्क संस्था काम करत आहे. उस्मानाबाद जिल्हा यात येत असल्याने मूलभूत समस्या व त्यावरील उपाययोजना कशा असाव्यात यासाठी “आमदार संवाद मंच” हा उपक्रम हाती घेतला आहे. स्थानिक वैचारिक तज्ज्ञांनी एकत्र येऊन चालवलेल्या गटाच्या माध्यमातून चारही विधानसभा क्षेत्रात हा उपक्रम राबविला जाणार आहे. आपल्या लोकप्रतिनिधीशी सातत्यपूर्ण संवाद साधत नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ही संस्था काम करणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उस्मानाबाद जिल्हा राज्यासाठी दिशादर्शक ठरेल, असे मत संपर्क संस्थेच्या मृणालिनी जोग यांनी व्यक्त केले.

मुंबईतील संपर्क संस्था अनेक वर्षांपासून युनिसेफ या जागतिक संस्थेशी संलग्न आहे. राज्यातील अनेक सामाजिक प्रश्नांची अभ्यासपूर्वक नोंदी घेऊन राज्यभर ही संस्था काम करते. मानव निर्देशांक कमी असणाऱ्या 7 जिल्ह्यात प्रामुख्याने विविध विषयांवर सध्या काम सुरू आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी या जिल्ह्यातील आमदार यांनी मागील 5 वर्षाच्या काळात कोणती कामे केली. आपल्या मतदार संघातील किती प्रश्न विधानसभेत विचारले, कोणते प्रश्न विचारले, त्या विषयाचा पाठपुरावा केला का ? अशा अनेक विषयावर संपर्क संस्था काम करत आहे.

तुळजापूर येथे आमदार संवाद मंचची दिनांक 3 डिसेंबर रोजी विविध विषयांवरील चर्चात्मक  बैठक सम्पन्न झाली. यावेळी मुंबई संपर्क संस्थेच्या मृणालिनी जोग, लता परब, हेमंत कर्णिक, यांच्यासह पंचायत समिती सभापती शिवाजी गायकवाड, डॉ. सतिश महामुनी, आनंद कंदले, गुलचंद व्यवहारे, संजयकुमार बोदर, धनाजी धोतरकर, महेश चोपदार, किरण चौधरी, विकास भालेकर, बालाजी बाशेवाड, सोमनाथ बनसोडे, संजय गायकवाड, शुभम कदम, अनिल आगलावे आदी यावेळी उपस्थित होते.

उस्मानाबाद जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात आमदार संवाद मचं स्थापन होणार आहे. या संवाद मंचच्या माध्यमातून अनेक विषयांवर काम केले जाईल. स्थानिक लोकप्रतिनिधी सातत्याने संवाद करीत मूलभूत सोयीसुविधांबाबत पाठपुरावा करण्यासाठी व मानव निर्देशांक उंचावण्यासाठी काम करण्याचा प्रयत्न केला जाईल.

मृणालिनी जोग, संस्थेच्या पदाधिकारी

एक वर्षातील निवडक कामे
तुळजापूर आमदार संवाद मंचच्या माध्यमातून तुळजा भवानी मंदिर परिसरात बाल भिक्षेकरी मुक्त अभियान सुरू आहे. त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन स्थरावर काम सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयींबाबत पाठपुरावा सुरू आहे. शहरातील स्वच्छतागृहांच्या कमतरतेमुळे भाविकांची गैरसोय होते असल्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे. तालुक्यातील माध्यमिक शाळा व महाविद्यालयात सॅनीटरी मशीन बसवण्यात याव्यात, यासाठी आमदार व शिक्षण विभागाशी चर्चा व निवेदन देण्यात आली. तसेच, दुष्काळग्रस्त बसवंतवाडी गाव दत्तक घेत समृद्ध गाव बनवण्यासाठी एक महिना श्रमदानातून जलसंधारणची कामे, देशी वृक्ष लागवड, शोष खड्डे, नाला सरळीकरण, पशुचिकित्सा शिबीर, महिलांची आरोग्य तपासणी, बेरोजगार तरुणांसाठी प्रशिक्षण शिबीर, महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून शेळी दूध संकलन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. सर्वच शासकीय कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र सोयीसुविधा युक्त स्वच्छता गृह असावे, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली आहे.

काय आहे संवाद मंच उपक्रम

विधानसभा क्षेत्रातील मूलभूत समस्या बाबत जाण असणारे वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ या संवाद मंचचे सदस्य आहेत. हा वैचारिक दबावगट म्हणून काम करतो. मराठवाड्यातील एकमेव आमदार संवाद मंच मागील एक वर्षापासून तुळजापूर येथे स्थापन झाला असून उत्तम पध्दतीने कामही सुरू आहे. अनेक सामाजिक प्रश्न हाती घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींशी सातत्याने संवाद केला जातो. प्रशासनाशी निवेदन देऊन समस्याबाबत पाठपुरावा केला जातो. तुळजापूरातील काम पाहून उस्मानाबाद जिल्ह्यातील उर्वरित उमरगा, उस्मानाबाद,भूम या तीनही विधानसभा क्षेत्रात आमदार संवाद मचंची निर्मिती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button