breaking-newsपुणेमहाराष्ट्र

उद्‌घाटनाला महिना; काम अजूनही होईना!

  • महापालिका नवीन विस्तारित इमारत : बांधकामाबाबत शंका कायम

पुणे – सर्वसामान्य नागरिकांना बांधकाम परवानगी आणि त्यानंतर भोगवटा पत्र देताना कायद्यावर बोट ठेवत कागदपत्रांचा किस पाडणाऱ्या महापालिका प्रशासनाने आपल्या नवीन विस्तारीत इमारतीसाठी “सारे काही माफ’ असा कारभार राबविला आहे. त्यामुळे या इमारतीच्या सभागृह आणि इमारतीचे उद्‌घाटन झाल्यानंतर तब्बल महिनाभराचा कालावधी लोटला असला, तरी या इमारतीचे अनेक ठिकाणी बांधकाम तसेच इतर कामे सुरूच असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यावर बोलण्यास कोणीही तयार नाही, हे विशेष.

प्रशासनाचाच कानाडोळा

महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीचे बांधकाम सुरू झाल्यानंतर त्यासाठी करण्यात आलेल्या खोदाईचे गौण खनिज शुल्क त्यानंतर, इमारतीसाठी आवश्‍यक “एफएसआय’ त्यावर उद्‌घाटनादिवशीच इमारत छताला लागलेली गळती, गॅलरीचा तुटलेला स्लॅब आणि आता तळमजल्यावरील पार्किंगच्या भिंतीना जिवंत पाण्याच्या झऱ्यांमध्ये या इमारतीच्या कामाबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत. मात्र, त्यानंतरही काहीच झाले नसल्याचे आव आणत महापालिका प्रशासनाकडून या प्रकाराकडे कानाडोळा केला जात असल्याचे वास्तव आहे.

काम अजूनही अर्धवटच

महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी पालिका भवन मुख्य इमारतीच्या मागे नवीन विस्तारीत इमारत बांधण्याचे निश्‍चित झाले. या तीन मजली इमारतीत फक्‍त नगरसचिव हा एकमेव प्रशासकीय विभाग राहून दुसऱ्या मजल्यावर पक्ष कार्यालये, तर तिसऱ्या मजल्यावर नवीन सभागृह आणि महापौर कक्ष असेल. यासाठी पालिकेने तब्बल 49 कोटी रुपयांचा खर्च केला. मात्र, पाण्यासारखा पैसा ओतून काम अर्धवट असतानाच; प्रशासकीय मान्यता पूर्ण असल्याचे दाखवत उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचे उद्‌घाटन 21 जून रोजी झाले. मात्र, पुढील तीन दिवसांत महिना पूर्ण होणार असला, तरी या इमारतीचे काम अजूनही अर्धवटच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही इमारत वापराविनाच असून ती पूर्ण होण्यास आणखी महिनाभर लागणार आहे.

एका इमारतीसाठी 6 निविदा; पैसा पुणेकरांचाच

महापालिका प्रशासनाने इमारत कामासाठी एकूण 6 निविदा प्रक्रिया राबविल्या. त्यात बांधकाम कंत्राट के.आर. ट्रेडर्स, अंतर्गत सजावट आणि पक्षनेते तसेच नगरसचिव कार्यालयाच्या फर्निचरचे काम पंडित उंदरे यांच्या कंपनीस, पदाधिकारी व नगरसचिव कार्यालय मॉड्युलर फर्निचर-कन्सेप्ट क्रीएटर्स कंपनी, मुख्य हॉल फर्निचर तसेच इमारत “जीआरसी’ व डोमचे काम-रायकॉन कन्सट्रक्‍शन कंपनी, तर फायर फायटिंग-एचडी फायकॉन या कंपनीस देण्यात आले आहे. या सर्व कामांसाठी पुन्हा सल्लागार नेमण्यासाठी अतिरिक्त 2 टक्के खर्च केला आहे. त्यानंतरही काम पूर्ण होत नसल्याने खासगी बांधकाम व्यावसायिकांची मदत घेऊन हे काम पूर्ण करण्याचा घाट घातला आहे. त्यामुळे या इमारतीच्या कामात अनेक चुका नव्याने समोर येत असून त्यासाठी पुन्हा पुणेकरांचाच पैसा खर्च केला जात आहे.

पालिकेचे अभियंते सक्षम नाहीत का?

महापालिकेच्या पथ, भवन, बांधकाम तसेच विद्युत विभागात तब्बल 653 अभियंते आहेत. त्यातील तब्बल 383 अभियंते बी.ई. (अभियांत्रिकी पदवीधर) आहेत. मात्र, एवढे प्रचंड प्रशिक्षित मनुष्यबळ असताना, पालिकेने त्यांच्याकडून फक्‍त या कामांचे एस्टिमेट करण्यापलीकडे काही केले नाही. हे काम खासगी ठेकेदारांना देण्यात आले. तरी, त्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने या इमारतीच्या अनेक सुमार कामांवरून लक्षात येत आहे. त्यामुळे स्वत:च्याच प्रशिक्षित मनुष्यबळाचा उपयोग घ्यावा, असे पालिकेला वाटत नाही का? असा प्रश्‍न आहे.

फक्‍त “स्ट्रक्‍चरल ऑडिट’चा घाट?; चुका झाकण्याची घाई

पालिका विस्तारित इमारत काम तसेच दर्जाबाबत तक्रारी येत असताना; झालेल्या चुका दडपल्या जात आहेत. प्रत्यक्षात इमारतीचा पाया खोदल्यानंतर मोठ्या प्रमाणात पाण्याचे जिवंत झरे असताना, बांधकाम लक्षात घेऊन त्यावर उपाययोजना करणे आवश्‍यक होते. मात्र, या झऱ्याला टाकी बांधून बंदिस्त करता येईल, असा समज करण्यात आला. त्यानुसार, भिंतीची रचनाही ठेवली. मात्र, जेव्हा नदीला पाणी आले तेव्हा या झऱ्याच्या पाण्याने पार्किंगच्या भिंतीतून जागा मिळेल तिथून वाट शोधण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे भिंतीबाबतही शंका उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी एका गॅलरीतून पावसाचे पाणी जाण्यासाठी पाइपच टाकला नसल्याचे समोर आले. त्यानंतर या भिंतीला छिद्र पाडण्यासाठी व्हायब्रेटर लावताच, भिंतीचा मोठा तुकडा तूटून पडला. यात एक कामगार महिलाही जखमी झाली. असे असताना; प्रशासनाने या इमारतीचे “स्ट्रक्‍चरल ऑडिट’ करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी सीओईपीने अवघ्या सात दिवसांत तो करावा, असे पत्र देत या कामांच्या चुकांवर पांघरून घालण्याची घाई प्रशासनाला झाल्याचे चित्र आहे.

का आहे चर्चेत नवीन इमारत?

उद्‌घाटनादिवशीच सभागृहाला 2 ठिकाणी गळती.

बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गॅलरीचा स्लॅब ढासळला.

प्रेक्षागृहातील फ्लोरिंग सुमार दर्जाचे असल्याने पुन्हा बदलणार.

इमारतीतील विद्युतीकरण अजूनही सुरूच.

इमारतीच्या पार्किंगच्या भिंतीला गळती.

पाण्याच्या जिवंत झऱ्यामुळे भिंतींना छिद्रे.

उद्‌घाटन झालेल्या सभागृहातील फर्निचरचे काम अर्धवटच.

इमारतीच्या लिफ्टचे काम अजूनही अर्धवटच.

इमारतीच्या अग्निशमन यंत्रणेचे काम अर्धवटच.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button