breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांचे निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा ; निवडणूक आयोगाची CBDTला विनंती

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे पुत्र व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे हे सध्या शपथपत्राच्या वादात सापडले आहेत. त्यांनी निवडणुकीच्या शपथपत्रात आपल्या संपत्तीची दिलेली माहिती चुकीची असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या तिघांच्या शपथपत्राची तपासणी करण्यास सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस म्हणजेच सीबीडीटीला सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रात दिलेली आपल्या संपत्तीची माहिती चुकीची आहे, अशी तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यानुसार निवडणूक आयोगाने या तिघांच्या शपथपत्राची तपासणी करण्यास सीबीडीटीला सांगितले आहे. १६ जूनला शपथपत्राबाबत निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एखाद्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिल्याचे आढळल्यास किंवा त्याबाबत तक्रार आल्यास निवडणूक आयोग त्याची दखल घेईल, असे आयोगाने त्यावेळी म्हटले होते. त्यानुसार आरटीआय कार्यकर्त्याने या तिघांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे महिनाभरापूर्वी तक्रार केली होती. त्यानंतर त्याने आयोगाला स्मरणपत्रही पाठवले होते. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या संपत्तीबाबत शपथपत्र दाखल केले होते. आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवताना आपल्या संपत्तीचे शपथपत्र दाखल केले होते. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान परिषदेची निवडणूक लढवताना शपथपत्र दाखल केले आहे. त्यांच्या या शपथपत्रांबाबत आलेली तक्रार निवडणूक आयोगाने सीबीडीटीकडे पाठवून त्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सीबीडीटी चौकशी करणार आहे. चौकशीत या आरोपांमध्ये काही तथ्य आढळले तर सीबीडीटी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करू शकते. या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button