breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

उत्तरेतील २५ जागांची दक्षिणेत भरपाई

भाजपच्या महाराष्ट्रातील नेते-मंत्र्यांवरही जबाबदारी

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेश, राजस्थानसारख्या उत्तरेतील राज्यांत २०१४ सारखी सर्वोत्तम कामगिरीची पुनरावृत्ती कठीण असून २० ते २५ जागांचा फटका बसू शकतो, असा अंदाज भाजपच्या केंद्रीय नेत्यांना आला आहे. त्यामुळेच या २५ जागांची भरपाई तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या दक्षिणेतील राज्यांमधून करण्याची रणनीती आखण्यात आली असून महाराष्ट्रातील काही नेत्यांनाही मतदारसंघ नेमून देण्यात आले आहेत.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत भाजपने मित्रपक्षांसह रालोआच्या माध्यमातून निवडणूक लढवली. स्वबळावर सत्ता मिळवत २८२ जागा मिळवल्या. देशात सर्वाधिक ८० खासदार निवडून देणाऱ्या उत्तर प्रदेशात भाजपने अभूतपूर्व विजय मिळवताना तब्बल ७१ जागा जिंकल्या, तर राजस्थानमध्ये २५ पैकी २५ जागा जिंकल्या होत्या. आता या दोन्ही राज्यांत अशा कामगिरीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता कमी दिसत आहे. भाजपच्या चाणाक्ष नेत्यांनी हे लक्षात घेऊन आताच या जागांची भरपाई करण्याची रणनीती आखली आहे. त्यासाठी तेलंगण, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या राज्यांमधून या जागा मिळाल्या तर केंद्रातील भाजपचे संख्याबळ चांगले राखणे शक्य होईल, असे भाजपचे गणित आहे.

दक्षिणेतून जिंकावयाच्या या २५ अतिरिक्त जागांसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक भाजप नेत्यावर ४ ते ५ जागांची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ठरावीक दिवसांनी या मतदारसंघाचा दौरा करणे, तेथील पक्ष संघटनेची, बूथप्रमुखांसारख्या निवडणूक यंत्रणेची व्यवस्था लावणे, ती कार्यरत ठेवणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे अशी जबाबदारी या नेत्यांवर आहे. खुद्द भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा या नियोजनानुसार काम होते की नाही याचा नियमित आढावा घेत असतात, अशी माहिती एका ज्येष्ठ नेत्याने दिली.

दौरा चुकला की अमित शहांचा फोन

दक्षिणेतील या जागांसाठी नियमित दौऱ्यांची आखणी भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून केली आहे. त्यानुसार मतदारसंघाची जबाबदारी असणाऱ्या नेत्यांना वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. काही वेळा महाराष्ट्र भाजपमधील नेता आपल्या कामामुळे दौऱ्यावर जाऊ शकत नाहीत. असा एखाद-दुसरा दौरा चुकला की खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा फोन येतो. ‘‘क्या चल रहा है, लगता है बहुत बिझी हैं,’’ एवढीच विचारणा अमित शहांकडून होते आणि त्या मंत्री-नेत्याचा काळजाचा ठोकाच चुकतो. त्यामुळे या राज्यांमधील दौरा शक्यतो चुकू नये, यासाठी संबंधित नेत्यांचा आटापिटा सुरू असतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button