breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उड्डाणपुलावर भाष्य करण्याआधी वाघेरेंनी स्वतःच्या दिव्याखालचा अंधार तपासावा – अनुप मोरे

पिंपरी / महाईन्यूज

‘निगडी भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचा आराखडा राष्ट्रवादीच्या कार्यकाळात तयार झालेला असला तरी, त्याला मंजुरी देऊन कामाचा शुभारंभ करून, मूर्त रूप देण्याचा बहुमान भाजपला मिळाला आहे. आता उड्डाणपुलाच्या विषयावरून उलट राष्ट्रवादीच  ‘आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा’ पराक्रम करताना दिसत आहे. भाजपने पुलाचे राजकारण न करता, त्यासाठी कधीही निधीची कमतरता भासू दिली नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे पुलाचे काम रखडले होते. येत्या महिना-दोन महिन्यात पुलाचे उर्वरित काम मार्गी लागून, पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. विकासकामाचे श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीला उदघाट्नचे राजकारण करायचे आहे. घाई-गडबडीत पुलाचे उदघाटन उरकण्याचा त्यांचा खटाटोप आम्ही हाणून पाडू, त्यासाठी आम्हीही सज्ज आहोत. राष्ट्रवादीच्या संजोग वाघेरेंना आत्मपरीक्षणाची खरी गरज आहे. भाजपवर आरोप करण्याआधी त्यांनी अगोदर स्वतःच्या दिव्याखालचा अंधार तपासावा, अशा शेलक्या शब्दात भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी राष्ट्रवादीच्या संजोग वाघेरे यांच्या टिकेला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.

पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून निगडीत भक्ती-शक्ती समुह शिल्पासमोर पुणे-मुंबई महामार्गावर दुमजली उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. उड्डाणपुलासाठी खोदकाम केल्यानंतर भूमिगत ड्रेनेजलाईन, विद्युत वाहन्या, पाणी पुरवठा लाईन, स्टॉर्म वॉटर लाईन आदी वाहिन्या अन्य ठिकाणी हलवण्याचे काम करावे लागले. यामध्ये वेळ गेला असला तरी पुलाचे काम सध्या ९८ टक्के पूर्ण झाले आहे. ग्रेड सेपरेटरमधील काम देखील ८० टक्के पूर्ण झाले आहे. पुढील दोन महिन्यांत हे काम मार्गी लागणार असून लवकरच पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. सत्ताधारी भाजपने महापालिका प्रशासनाकडून हे काम जबाबदारीने पूर्ण करून घेतले आहे. शंभर टक्के काम पूर्ण झाल्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी खुला करणे उचीत ठरणार आहे. कारण, काम सुरू असताना पुणे-मुंबई लेन सुरू केल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, एखादा उपघात ओढवून घेण्याची वेळ येणार आहे. नागरिकांच्या सुरक्षितेचा विचार करून शंभर टक्के काम पूर्ण झाल्यानंतरच हा पूल खुला करावा, अशी आमची मागणी आहे. यात विरोधकांकडून श्रेयवादाचे राजकारण केले जात आहे. नागरिकांच्या विकास कामाचे श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादी बिनबुडाचे आरोप करू लागली आहे, अशीही टिका मोरे यांनी केली आहे.

या पुलाचा नियोजित आराखडा राष्ट्रवादीच्या कार्यकाळात तयार झाला असला तरी, पूल उभारण्यात राष्ट्रवादीला अपयश आले. त्यांच्या काळात हा पुल उभारला असता तर, नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला नसता. राष्ट्रवादीच्या महापालिकेतील तत्कालीन पदाधिका-यांनीच खोडा घातल्यामुळे या पुलाच्या कामाला उशीर झाला. त्यामुळे भक्ती-शक्ती चौकात वाहतूक कोंडीचा मुद्दा गहन बनल्याने भाजपने पुलाचे काम तातडीने हाती घेतले. २०१७ च्या स्थायी समितीने पुलासाठी ९०.५४ कोटींच्या खर्चाला मंजुरी देऊन कामाला सुरूवात केली. आज रोजी पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे.

काम पूर्ण होत असल्याचे दिसताच याचे श्रेय लाटण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांची धडपड सुरू झाली आहे. शहरात उभारलेल्या जम्बो कोविड सेंटरमधील कामगारांना वेतन न दिल्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे आंदोलन सुरू असताना कामगारांचे गा-हाणे ऐकून घेण्याचे औदार्यदेखील राष्ट्रवादीच्या संजोग वाघेरेंनी दाखविले नाही, असे अनुप मोरे यांनी या पत्रकात म्हटले आहे.


निगडीतील भक्ती शक्ती चौकातील उड्डाणपूलाचा आराखडा मंजूर झाला तेव्हा हा पूल उभारण्याच्या कामाला सुरूवात करण्यात राष्ट्रवादीला अपयश आले. आता भाजपने हे काम यशस्वीरित्या मार्गी लावले असता, याचे श्रेय लाटण्याचा राष्ट्रवादी प्रयत्न करत आहे. भाजपने नागरिकांच्या हिताला प्राधान्य देऊन विकासकामे केली आहेत. उड्डाणपुलाचे शंभर टक्के काम पूर्ण झाल्यानंतर सुरक्षित प्रवासाचा विचार करून, हा पूल नागरिकांसाठी खुला करावा, एवढीच आमची मागणी आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने घाणेरडे राजकारण करू नये. घाई-गडबडीत पुलाचे उदघाटन उरकण्याचा त्यांचा खटाटोप आम्ही हाणून पाडू, त्यासाठी आम्हीही सज्ज आहोत.

  • अनुप मोरे, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button