breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

अलका कुबल यांनी घेतली छत्रपती उदयनराजेंची भेट

सातारा – सोनी मराठी वाहिनीवरील ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सध्या साताऱ्यात सुरू असून मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल-आठल्ये आणि याच मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. या प्रकरणी अभिनेत्री अलका कुबल यांनी रविवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन अलका कुबल यांना दिले. त्याचबरोबर प्राजक्ता गायकवाड हिच्याशीही फोनवरून चर्चा करत वाद मिटवण्याची सूचना केली. या भेटीबाबत उदयनराजे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

अलका कुबल आणि अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्यातील वाद सोशल मीडियावर चांगलाच रंगला आहे. सध्या या प्रकरणात साताऱ्यासह राज्यातील काही संघटनांनी अलका कुबल यांनी प्राजक्ता गायकवाडची माफी मागावी आणि मालिकेतील प्रमुख कलाकार असलेल्या रवी सांगळेला मालिकेतून काढून टाकावे अन्यथा साताऱ्यात सुरू असलेले या मालिकेचे चित्रीकरण बंद पाडण्याची धमकी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये आणि समीर आठल्ये यांनी उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन चित्रीकरणाच्या सेटवर प्राजक्ता गायकवाड यांची वस्तुस्थिती नेमकी काय होती ही मांडली.

अलका कुबल यांनी या भेटीदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ‘सतत येणारे धमक्यांचे फोन आणि तथ्यहीन आरोप यांच्याविरोधात आम्ही छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. मी स्वत: मराठा कुटुंबात जन्मले, त्यामुळे मी विनंती करते की खोट्या आरोपांवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही धर्म किंवा जातीविरोधात आम्ही नाही’, असं त्यांनी या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, उदयनराजे यांनी अलका कुबल यांची बाजू जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडसोबत फोनवर चर्चा करुन हा वाद लवकरात लवकर मिटवावा, अशी विनंती केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button