breaking-newsमहाराष्ट्रराष्ट्रिय

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ विरोधकांचा आज ‘भारत बंद’

पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने सोमवारी ‘भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केले आहे.

गांधीभवन येथे पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी बंदबाबतची भूमिका विशद केली. चव्हाण म्हणाले की, २०१४ मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे ११० डॉलर प्रति बॅरल होती तेव्हा मुंबईत पेट्रोलचा दर ८० रुपये तर डिझेलचा दर साधारणपणे ६४ रुपये प्रति लिटर होता. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत सुमारे ८० डॉलर प्रति बॅरल म्हणजेच २०१४च्या तुलनेत ३० डॉलरने कमी आहे. तरीही आज मुंबईत पेट्रोलचे दर ८७.८९ रुपये आणि डिझेलचे दर ७७.०९ रुपये एवढे आहेत. सरकार इंधनावर कर आणि अधिभार लावून सर्वसामान्य जनतेची लूट करीत आहे. इंधनदरवाढीमुळे वाढलेल्या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. सरकारने तात्काळ पेट्रोल, डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणावे व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण मुंबई येथे, साताऱ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अहमदनगरमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, नागपूरमध्ये सरचिटणीस मुकुल वासनिक आंदोलनात सहभागी होणार आहेत.

हे आंदोलन नागरिकांना दिलासा देण्यासाठी आहे. त्यामुळे या आंदोलनात जनतेचे, व्यापाऱ्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होणार नाही, तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही याची दक्षता काँग्रेस कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन अशोक चव्हाण यांनी केले आहे.

या पक्षांचा पाठिंबा

‘भारत बंद’ला राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, डावे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, आ. प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स रिपब्लिकन पार्टी, राजेंद्र गवई यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पार्टी या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

एसटीच्या जादा गाडय़ा दुपारनंतर

‘भारत बंद’मुळे गणेशोत्सवानिमित्त घोषित केलेल्या एसटीच्या विशेष बसगाडय़ा सोमवारी सकाळऐवजी दुपारी ३ नंतर सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button