breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

इंटरनेटवर बँकेचा पत्ता शोधणे महागात!

बँकेऐवजी भामटय़ाचा संपर्क क्रमांक; ज्येष्ठ नागरिकाला एक लाख रुपयांचा गंडा

बँकेच्या शाखेचा बदललेला पत्ता इंटरनेटच्या माध्यमातून शोधण्याचा प्रयत्न एका ज्येष्ठ नागरिकाला भलताच महागात पडला. गुगल या प्रसिद्ध संकेतस्थळावर बँकेच्या नावाखाली भलत्याच व्यक्तीचा संपर्क क्रमांक होता. या भामटय़ाने संबंधित ज्येष्ठ नागरिकाला बँक अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या खात्यातील एक लाख रुपये लांबवले. पवई पोलीस या भामटय़ाचा शोध घेत आहेत.

गोदरेज कंपनीतून निवृत्त झालेले दत्ताराम मालपेकर (६०) पवईच्या हिरानंदानी परिसरात कामानिमित्त आले होते. काम आटोपून ते विक्रोळी पश्चिमेकडील बँक ऑफ इंडिया शाखेत जीवन विमा योजनेच्या कामासाठी जाणार होते. बँकेची शाखा विक्रोळीतून घाटकोपरला हलविण्यात आल्याची माहिती मिळताच त्यांनी ‘गुगल’ची मदत घेत बँकेच्या शाखेचा नवा पत्ता, संपर्क शोधण्याचा प्रयत्न केला. संकेतस्थळावर घाटकोपर येथील बँकेचा पत्ता आणि काही संपर्क क्रमांक दर्शविण्यात आले. त्यापैकी एका क्रमांकावर मालपेकर यांनी संपर्क साधला.

समोरून बोलणाऱ्याने स्वत:ला बँक अधिकारी असे भासवले. जीवन विमा योजनेचे काम ऑनलाइन करता येईल, असा सल्ला दिला. या अधिकाऱ्याने बँक खात्याचे तपशील मागितले. सोबत डेबिट कार्डाच्या तपशिलांबाबत विचारणा केली. खात्यावर किती रक्कम जमा आहे, असेही विचारले. मालपेकर यांच्या खात्यावर चार हजार रक्कम जमा होती. ही रक्कम कमी असून अन्य बँक खात्याचे डेबिट कार्ड आहे का, अशी विचारणा झाली. तेव्हा मालपेकर यांनी त्यांच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या डेबिट कार्डाचे तपशीलही या अधिकाऱ्याला दिले. या खात्यावर त्यांचे निवृत्तिवेतन जमा होते.

‘‘त्या व्यक्तीने मला बोलण्यात अशा प्रकारे गुंतवले की, मी दोन्ही डेबिट कार्डाचे सर्व तपशील आणि मोबाइलवर लघुसंदेशाद्वारे आलेले चार ओटीपी क्रमांकही त्याला देऊन बसलो. पुढल्या काही सेकंदांत माझ्या दोन्ही खात्यांवरून ९८ हजार रुपये काढले गेले. त्या व्यवहारांबाबत लघुसंदेशाद्वारे समजताच फसवणूक झाल्याची जाणीव झाली,’’ असे मालपेकर यांनी सांगितले. यातील एक व्यवहार एका ट्रॅव्हल कंपनीशी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

अनोळखी व्यक्तीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल पोफळे यांनी दिली. भामटय़ाने स्वत:चा संपर्क क्रमांक गुगलवर बँकेच्या नावे कसा दिला, हे शोधण्याचे काम सुरू आहे. तांत्रिक तपासातून भामटा परराज्यातून तक्रारदाराशी बोलत होता, ऑनलाइन व्यवहार करीत होता, अशी माहिती मिळाल्याचे पोफळे यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button