breaking-newsमहाराष्ट्र

दिवसा सत्संग; रात्री घरफोडय़ा आणि वाहनचोऱ्या

दोघा सराईत चोरटय़ांकडून ११ लाखांचा ऐवज जप्त

पुणे : देवाची आळंदी येथे दिवसा सत्संग करणारे दोन युवक रात्री घरफोडय़ा आणि वाहनचोऱ्या अशी कामे करीत होते. या दोघा चोरटय़ांना हडपसर पोलिसांनी शिताफीने पकडून त्यांनी केलेले २० गुन्हे उघडकीस आणले. सोन्याचे दागिने, दुचाक्या, मोबाइल असा  ११ लाखांचा ऐवज जप्त केला.

सागर दत्तात्रेय भालेराव (वय २१) आणि स्वप्नील नामदेव गिरमे (वय २४, रा. हडपसर, दोघे रा. मांजरी, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे करताना पकडले जाऊ नये यासाठी या सराईत गुन्हेगारांनी आळंदी येथील सत्संग शिबिरामध्ये नावनोंदणी केली. दिवसा सत्संगामध्ये राहून रात्रीच्या सुमारास कामानिमित्त बाहेर पडून शहरात घरफोडय़ा आणि वाहनचोरीचे गुन्हे केले.

हडपसर भागात मागील काही महिन्यांमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यंत वाढ झाली होती. त्या पाश्र्वभूमीवर पोलीस गुन्ह्य़ातील आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, आळंदी येथील सत्संग शिबिरामध्ये राहणारे  युवक हडपसर परिसरात चोऱ्या करीत असून सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी ते हडपसर भागात येणार आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार हडपसर  पोलिसांच्या पथकाने गुरुवारी (७ फेब्रुवारी) सापळा रचला आणि मंत्री मार्केट परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अंगझडतीमध्ये सोन्याचे दागिने आढळून आले. त्याबाबत चौकशी केली असता त्यांनी या दागिन्यांची चोरी केली असल्याची माहिती  दिली.

त्यांच्याकडून घरफोडी, वाहनचोरी, चोऱ्या असे २० गुन्हे उघडकीस आणले. त्यात हडपसर १४, सहकारनगर २ आणि मुंढवा, वानवडी, चंदननगर आणि दिघी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एका गुन्ह्य़ाचा समावेश आहे.

१३१ ग्रॅम वजनाचे  सोन्याचे दागिने, पाच दुचाकी, दहा मोबाइल फोन, दोन एलसीडी टीव्ही, एक कॅमेरा आणि २६ हजार रुपयांची रोकड असा ११ लाख रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button