breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

‘आयोडीन’ दैनंदिन आहारातील अत्यावश्यक पोषक घटक

‘आयोडीन’ हा आपल्या दैनंदिन आहारातील अत्यावश्यक पोषक घटक आहे. आपली पचनसंस्था, शरीराची वाढ आणि विकास यावर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आयोडीन अतिशय गरजेचं असतं.  प्रत्येक व्यक्तीला, खासकरून लहान बाळे आणि गर्भवती स्त्रियांना योग्य प्रमाणात आयोडीन मिळत राहणे खूप आवश्यक असते.  गर्भार काळात आणि लहान वयात शरीरातील हाडे आणि मेंदूच्या विकासासाठी शरीराला थायरॉईड हार्मोन्स हवे असतात. एका अनुमानानुसार जवळपास ३५० दशलक्ष लोकांच्या शरीरात आयोडीनची कमतरता असते आणि त्यामुळे त्यांना अनेक आजार, शारीरिक समस्या सहन कराव्या लागतात. याचे प्रमुख कारण म्हणजे हे लोक अपुरे आयोडीन असलेले मीठ वापरतात.  

भारतासारख्या विशाल देशामध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक समस्या टाळण्याचा आणि प्रत्येक व्यक्तीला दररोज योग्य प्रमाणात आयोडीन मिळत राहावे यासाठी रोजच्या जेवणातून योग्य प्रमाणात आयोडीन असलेले मीठ वापरणे हा सर्वात सोपा उपाय आहे.

आयोडीन हे जास्त करून मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्यांमध्ये असल्या कारणाने शाकाहारी व्यक्तींना रोजच्या रोज पुरेश्या प्रमाणात आयोडीन मिळणे कठीण असते.  विगन आणि शाकाहारी दैनंदिन आहारात आयोडीन कमी प्रमाणात असल्यामुळे बहुतांश लोकांना इतर मार्गाने आयोडीन मिळवणे गरजेचे असते.  भारतात मातीमध्ये आयोडीनची कमतरता आहे, अशा मातीमध्ये पिकवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये देखील आयोडीन कमी असते, त्यामुळे खाण्यामध्ये आयोडीनच्या कमतरतेची समस्या अधिक वाढते.  आपले वय कितीही असो आणि जीवनशैली कशाही प्रकारची असो, पुरेशा प्रमाणात आयोडाइज्ड मीठ वापरणे अत्यंत गरजेचे आहे, ही आपल्या शरीराची अत्यावश्यक गरज आहे.

आयोडीनच्या कमतरतेमुळे सर्वाधिक धोका स्त्रिया आणि लहान मुलांना निर्माण होतो.  गरोदर असताना पोषक आहार घेणे महत्त्वाचे असते हे बहुतांश मातांना ठाऊक असते पण गर्भाच्या मेंदूच्या वाढीसाठी आयोडीन अत्यंत गरजेचे आहे ही बाब मात्र खूपच कमी स्त्रियांना माहिती असते.  गरोदर काळात स्त्रीच्या शरीराला अतिरिक्त प्रमाणात आयोडीन गरजेचे असते कारण गर्भालाही पुरेशा प्रमाणात आयोडीनचा पुरवठा व्हावा लागतो.  

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या आठवड्यापासूनच स्त्रीच्या शरीराची आयोडीन आणि थायरॉईड हार्मोन्सची मागणी वाढलेली असते हे माहिती नसल्यामुळे अनेक स्त्रिया अजाणतेपणाने आयोडीनच्या कमतरतेच्या शिकार बनतात.  हे टाळण्यासाठी त्यांना अतिरिक्त प्रमाणात आयोडीन पुरवणे गरजेचे असते.  सर्व गर्भवती आणि स्तनपान करवणाऱ्या मातांना दररोज पुरेशा प्रमाणात आयोडीन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button