breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आयुक्तसाहेब… ठेकेदार, पदाधिका-यांचे हट्ट पुरविणे बंद करा – खासदार श्रीरंग बारणे

निविदा रद्द करुन क्षेत्रीय कार्यालयानिहाय स्वतंत्र निविदा काढाव्यात

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रस्ते यांत्रिकी पध्दतीने साफसफाई करण्याच्या सुमारे 647 कोटींच्या निविदेत रिंग झाली आहे. सहा ठेकेदारांनी संगणमत करुन निविदा भरल्या आहेत. केवळ ठेकेदार आणि पदाधिका-यांचे हट्ट पुरविण्यासाठीच निविदा प्रक्रिया राबविल्याचा आरोप शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. तसेच ही निविदा रद्द करुन क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र निविदा काढण्यात यावी, अशी सूचनाही त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केली आहे.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या रस्त्यांची तसेच मुंबई-पुणे महामार्गाच्या दुतर्फा रस्त्यांची यांत्रिकी पध्दतीने दैनंदिन साफसफाई करण्याची निविदा 646 कोटी 53 लाख रुपयांची आहे. यामध्ये 51 वाहने वापरली जाणार आहेत. ही निविदा बनवत असताना पुणे महापालिकेचा दाखला घेणे गरजेचे होते. पुणे महापालिकेचे काम एका वर्षात बंद करावे लागले आहे. अशाप्रकारे संपूर्ण यांत्रिकी साफसफाई पिंपरी-चिंचवड शहरात शक्य नाही. केवळ ठेकेदार आणि पदाधिका-यांचे हट्ट पुरविण्यासाठीच निविदा प्रक्रिया राबविली आहे.

या सर्व कामांचे एकत्रिकरण करण्याची काय आवश्यकता होती?. सलग सात वर्ष एकच ठेकेदार काम करणार आहे. भविष्यात कामगारांनी बंद केल्यास शहर कच-यात जाईल. दरवर्षी दरवाढ देखील दिली जाणार आहे. यांत्रिकीकरणामध्ये एक गाडी 50 लाख रुपये धरली. तर, 57 गाड्यांचे 25 ते 30 कोटी रुपये होतात. महापालिकेने स्वत: गाड्या खरेदी कराव्यात. कामगार स्वयंरोजगार संस्थाकडून काम करुन घ्यावे. त्यांना देखील रोजगार मिळेल. महत्वाचे म्हणजे महापालिकेचे पैसे वाचतील, असे बारणे यांनी म्हटले आहे.

या कंत्राटात सहा ठेकेदारांनी संगणमत करुन निविदा भरल्या आहेत. यामधील जाचक अटींमुळे निकोप स्पर्धा झाली नाही. त्यामुळे तत्काळ ही निविदा रद्द करण्यात यावी. क्षेत्रीय कार्यालयनिहाय स्वतंत्र निविदा काढाव्यात, अशी मागणी खासदार बारणे यांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button