breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अडीच लाखांचे भेसळयुक्त पनीर जप्त; गुन्हे शाखेच्या युनिटची कारवाई

पुणे |महाईन्यूज|प्रतिनिधी

कोणताही परवाना नसताना बेकायदेशीरपणे विक्री होत असताना गुन्हे शाखेच्या युनिट ४च्या पथकाने अडीच लाख रुपयांचे १ हजार ४१० किलो भेसळयुक्त पनीर पकडले. अन्न व औषधे प्रशासनाने हे पनीर जप्त केले असून त्याचे सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकामधील हवालदार गणेश साळुंके यांना पर्वती येथील विष्णु सोसायटीतील एका दुकानात भेसळयुक्त पनीर विकले जात असल्याची माहिती मिळाली. अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे व पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांना त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक गणेश पवार, हवालदार गणेश साळुंके, सुनिल पवार, राकेश खुनवे, निलेश शिवतरे, यांचे पथक व अन्न व औषधे प्रशासनाचे निरीक्षक कुलकर्णी, काकडे यांनी या दुकानावर मंगळवारी छापा घातला. या दुकानाला कोणतेही नाव नव्हते. पनीर विक्री करण्यासाठी लागणारा अन्न व औषधे प्रशासनाचा परवाना नव्हता. दुकानामध्ये हरिकृष्ण मुरलीधर शेट्टी हा पनीरची विक्री करीत होता.

पनीरची माहिती घेतली असता ते प्रथमदर्शनी दिलेल्या दर्जानुसार आढळून आले नाही. तेव्हा दुकानातील सर्व पनीरचे वजन करण्यात आले. ते १ हजार ४१० किलो इतके असून त्यांची किंमत बाजारभावाप्रमाणे २ लाख ५३ हजार रुपये इतकी आहे. अन्न व औषधे प्रशासनाने हे जप्त केले आहे. त्यातील काही सॅम्पल तपासणीसाठी पाठविण्यात आले असून उर्वरित शितगृहात सुरक्षित ठेवण्यात आले आहे. या पनीरबाबत अधिक चौकशी केली असता ते पालघरमधील वाडा तालुक्यातून आणले असल्याची माहिती मिळाली. पुढील कारवाई अन्न व औषधे प्रशासन करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button