breaking-newsमुंबई

आमचा कारभार पारदर्शकच!

  • उद्धव ठाकरे यांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला; सागरी किनारा मार्गाचे भूमिपूजन

सागरी मार्गाच्या नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंतच्या प्रक्रियेत पालिकेने संपूर्णत: पारदर्शकता ठेवली असून आमचा कारभार ‘पारदर्शक’च असल्याचा दावा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केला.

मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या सागरी किनारा मार्ग प्रकल्पातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी येथील सागरी सेतू या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन ठाकरे यांच्या हस्ते वरळी येथील अमरसन्स उद्यान येथे झाले.

सरकारसारखे आम्ही कोत्या मनाचे नाही, असा टोला लगावताना ठाकरे यांनी सागरी मार्गाला परवानगी दिल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले. याचप्रमाणे ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करात माफी देण्याचा गेली दहा वर्षे सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रस्तावालाही लवकर मंजुरी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुंबईच्या पूर्व किनारपट्टीवरील सुमारे ९०० एकर जागा वापरात आणून त्या जागी संग्रहालय वा तत्सम प्रकल्प हाती घेऊन सरकारने मुंबईकरांना मोकळी जागा उपलब्ध करून द्यावी. सरकारला हे जमत नसल्यास पालिका समर्थ आहे, असेही ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईकडून सरकारला दिल्या जाणाऱ्या कराचा उल्लेख करून ठाकरे म्हणाले की, मुंबईला सरकारने दिले असे म्हणण्यापेक्षा मुंबईच तुम्हाला देते. मात्र त्या तुलनेत मुंबईला सरकारकडून काहीही मिळत नाही, अशी खंतही व्यक्त केली. या मार्गाचे भूमिपूजन आम्ही केले, तसे उद्घाटनही  करणार. भूमिपुत्र कोळी बांधवांना या मार्गामुळे कोणताही धोका होणार नाही. या प्रकल्पाबाबत शंका असलेल्या सर्वच लोकांसोबत येत्या मंगळवारी चर्चा केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

भाजपचा बहिष्कार

सागरी किनारा मार्गाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण दिले नसल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. भाजपचे स्थानिक आमदार मंगलप्रभात लोढा, स्थानिक नगरसेविका सरिता पाटील, भाजप नेता मनोज कोटक आणि प्रभाग समितीचे अध्यक्ष अतुल शहा यांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे मुंबईतील इतक्या महत्त्वाच्या प्रकल्पाचा कार्यक्रम राजकीय हेवेदाव्यांचीच चर्चा झाली. सोहळ्याबाबत वाद सुरू झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून भाजप आणि सेनेची फलकबाजी सुरू झाली होती. सेनेचे ‘करून दाखवलं’, तर भाजपचे ‘परवानग्या मिळाल्या’ अशी श्रेय लाटण्याची धडपड सुरू होती.

राज यांचा इशारा

सागरी मार्गामुळे मासेमारी धोक्यात येत असल्याने कोळी बांधव याला विरोध करीत आहेत. भूमिपूजनाच्या दिवशीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वरळी येथील मच्छीमारांची भेट घेतली. प्रशासनाने आडमुठेपणाची भूमिका घेत यातून मार्ग न काढता प्रकल्प केला तर संघर्ष करावा लागेल, असा इशारा राज यांनी दिला.

सागरी किनारा मार्ग

  • नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान मुंबई सागरी किनारा प्रकल्प
  • पहिल्या टप्प्यातील प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सागरी सेतूदरम्यानच्या मार्गाची जबाबदारी पालिकेची
  • सुमारे १२ हजार ७०० कोटी रुपयांचा प्रकल्प
  • अंदाजे १० किलोमीटर लांबीचा टोलमुक्त मार्ग
  • चार वर्षांत पूर्ण होणार
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button