breaking-newsराष्ट्रिय

आगामी निवडणुकांत शिवसेनेशी युती होणारच!

भाजपच्या उच्चपदस्थ नेत्याचे संकेत

नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याचा निर्धार शिवसेना आणि भाजप नेत्यांनी व्यक्त केला असला तरी, त्यांची युती कायम राहणार असल्याचे संकेत भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने गुरुवारी दिले.

लोकसभा-विधानसभा निवडणूक भाजप-सेना एकत्रच लढवतील, असे या नेत्याने स्पष्ट केल्याने युतीबाबत अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपासून दोन्ही पक्षांतील दुरावा वाढत गेला आहे. शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढवतील अशी चर्चा सुरू झाली होती. किंबहुना दोन्ही पक्षांच्या खासदारांनी आणि इच्छुक उमेदवारांनीही स्वतंत्र निवडणुकीची मानसिक तयारी केली होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीररीत्या भाजपविरोधात भूमिका घेतली होती. भाजप नेतृत्वानेही शिवसेनेशिवाय लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करण्याची सूचना नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना दिली होती. मात्र, युती संपुष्टात आल्याचे या भाजप नेत्याने फेटाळून लावले. शिवसेनेशी दररोज चर्चा सुरू असल्याचेही या नेत्याने सांगितले.

राज्यात शिवसेना-भाजप युती काँग्रेस आघाडीला रोखण्यात यशस्वी होईल. लोकसभा वा विधानसभेच्या भाजपच्या आणि युतीच्याही जागा कमी होणार नाहीत, असा विश्वास वरिष्ठ नेत्याने व्यक्त केला. गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा जिंकणे हेच लक्ष्य आहे, असे या नेत्याने सांगितले.

मोदी वाराणसीतूनच लढणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतूनच लोकसभेची निवडणूक लढतील, यावर या नेत्याने शिक्कामोर्तब केले. पंतप्रधानपदावरील व्यक्तीने मतदारसंघ बदलू नये. त्यामुळे मोदींनीही वाराणसी मतदारसंघ सोडण्याचे कोणतेही कारण नाही, असे या नेत्याने स्पष्ट केले. मात्र, मोदी गेल्या लोकसभेप्रमाणे यावेळीही अन्य मतदारसंघातूनही लोकसभेचा उमेदवारी अर्ज भरू शकतात, या शक्यतेलाही या नेत्याने दुजोरा दिला. हा मतदारसंघ कोणत्या राज्यातील असेल, हे मात्र त्याने स्पष्ट केले नाही. मोदी पश्चिम बंगालमधील मतदारसंघाची निवड करतील, असे मानले जात असले तरी त्यावर या नेत्याने टिप्पणी केली नाही.

प्रियंकामुळे फरक पडणार नाही!

प्रियंका गांधी वढरा यांच्या राजकारण प्रवेशामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला किंचितही फरक पडणार नाही. प्रियंका यांच्यामुळे उच्चवर्णीय विशेषत: ब्राह्मण मतदार काँग्रेसकडे जाण्याची कोणतीही शक्यता नाही. प्रियंका यांचा सवर्णाशी संबंधच काय, असा प्रश्न या नेत्याने केला. लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी काँग्रेसचा निकराचा प्रयत्न आहे. आता कदाचित उत्तर प्रदेशमध्ये तिहेरी लढत होईल आणि ती भाजपसाठी फायद्याचीच ठरेल. सप-बसप आघाडी विरुद्ध भाजप अशी दुहेरी लढत झाली असती तरी भाजपला चालले असते. मायावती यांना पंतप्रधान व्हायचे आहे. काँग्रेसने ही मागणी मान्य केली तर मायावती काँग्रेसला ४० जागाही उत्तर प्रदेशात देऊ करतील, अशा शब्दांत उत्तर प्रदेशच्या विरोधकांच्या राजकारणाची या नेत्याने खिल्ली उडवली.

‘ईव्हीएम’चा मुद्दाच वायफळ!

‘ईव्हीएम’मध्ये भाजपने घोटाळा केला असता तर पक्ष एकाही निवडणुकीत पराभूत झाला नसता. कर्नाटक, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांमध्ये भाजप कसा हरला असता? एखाद्या अल्पवयीन मुलगा हा विचार करू शकतो, परंतु तो राजकीय पक्षांना करता येत नाही, असा उपहास या नेत्याने केला.

पंतप्रधान कोण हे महत्त्वाचे!

पंतप्रधान कोण असेल हे पाहून मतदार कौल देतील. २०१९मध्येही मोदीच पंतप्रधान होतील आणि ‘एनडीए’ला पूर्ण बहुमत मिळेल, असा दावा या नेत्याने केला. पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित नसल्याचा फटका महाआघाडीला बसेल. लोकसभा निवडणूक जातीवाद, घराणेशाही आणि तुष्टीकरण या विरोधात लढवली जाणार असल्याचेही या नेत्याने सांगितले.

राम मंदिरासाठी कायद्याची घाई नको!

राम मंदिर लवकरात लवकर उभे राहावे, असे भाजपलाही वाटते. मात्र, त्यासाठी कायदा करण्याची घाई करू नये. कायदा केल्यास तो न्यायालयात टिकेल की नाही, याचाही विचार करायला हवा, असे मत या नेत्याने मांडले.

राज्यात एकत्रित निवडणुका?

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित घेण्याचा अंतिम निर्णय झाला नसला तरी त्याची शक्यता या नेत्याने नाकारली नाही. दोन्ही पक्षांची तयारी कितपत होते आणि मतदारयाद्यांसह अन्य बाबींची पूर्तता कशी होते यावर एकत्रित निवडणुका घेण्याचा निर्णय होऊ शकतो, असे या नेत्याने सांगितले. हरियाणामध्ये मात्र एकत्रित निवडणुका होणार नाहीत, असे या भाजप नेत्याने स्पष्ट केले.

राणे भाजपमध्येच!

भाजपच्या बी फॉर्मवर राज्यसभेत गेलेले नारायण राणे भाजपमध्येच आहेत. जाहीरनामा समितीत त्यांचा समावेश केलेला आहे. राणेंनी राजकीय पक्ष काढलेला नाही. त्यांनी एनजीओ काढलेली आहे. पण, हा सगळा तांत्रिक भाग असून त्याला फार महत्त्व देऊ   नका, असे या भाजप नेत्याचे म्हणणे आहे. वास्तविक, राणे यांनी आपल्या राजकीय पक्षातर्फे .विधानसभेच्या ५० जागा लढवण्याचा मनोदय  व्यक्त केला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button