breaking-newsपुणेमहाराष्ट्र

अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे

वाहनांची जाळपोळ, तोडफोडीच्या गुन्हय़ात सहभाग; भाईगिरीचे वाढते आकर्षण

पुणे : टोळ्यांमधील वर्चस्वाचा वाद आणि किरकोळ भांडणातून वाहनांच्या तोडफोडीच्या घटना शहरात वाढीस लागल्याचे चित्र आहे. तोडफोड तसेच दहशत निर्माण करण्याच्या प्रकारांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढता सहभाग आहे. भाईगिरीचे आकर्षण आणि त्यातून समाजात आपला दबदबा निर्माण होईल, या भाबडय़ा समजुतीतून अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळत असल्याचे वास्तवही पाहायला मिळत आहे.

पुणे शहरात गेल्या काही वर्षांपासून संघटित गुन्हेगारी टोळय़ांनी पाळेमुळे रोवली. शहरातील बहुतांश टोळय़ांच्या म्होरक्यांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील टोळीयुद्धाला चाप बसला आहे. मोक्का कारवाईत न्यायालयाकडून जामीन मंजूर होत नसल्याने म्होरके कारागृहात आहेत, मात्र शहरातील अनेक टोळय़ांचे प्रमुख आणि त्यांच्या साथीदारांविषयी अल्पवयीन मुलांना आकर्षण वाटत असल्याने त्यांचा गुन्हेगारी कृत्यांत वाढता सहभाग आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले तसेच अनेक महाविद्यालयीन युवकांना भाईगिरीचे आकर्षण वाटते. परिसरात दबादबा निर्माण करण्याच्या प्रकारांमधून अल्पवयीन मुलांच्या गटांमध्ये वादावादीचे प्रकार घडतात. या वादातून सामान्यांच्या घरांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडतात. अशा प्रकारच्या गुन्हय़ांमध्ये अल्पवयीन मुले सहभागी असतात.

तोडफोडीच्या घटनांबरोबर चोरी, वाहनचोरी असे गुन्हेही अल्पवयीन मुले करत आहेत. वाहनचोरीच्या घटनांमध्ये काही उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांना ताब्यात घेण्यात आले होते. दुचाकी फिरविण्याच्या हौसेपोटी काही मुले दुचाकी चोरतात आणि त्यातील पेट्रोल संपले की रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून पसार होतात.

कायद्याचा अडसर

अल्पवयीन मुलांच्या गुन्हेगारी कारवायांवर जरब बसविण्यात पोलिसांना मर्यादा येतात. अल्पवयीन मुलांना अटक न करता ताब्यात घेण्यात येते. त्यांना बाल न्यायालयात हजर करण्यात येते. गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ातील अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात येते. तेथे वर्षभर राहून अल्पवयीन मुले पुन्हा गुन्हेगारीकडे वळतात. तोडफोडीच्या गुन्हय़ात तर अल्पवयीन मुले किंवा सज्ञान युवक असल्यास त्याची एक ते दोन दिवसांत जामीनावर सुटका होते. सराईत गुंडांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येते. त्यामुळे सराईत गुन्हेगार किमान तीन ते चार वर्षे कारागृहात गजाआड राहतो.

अल्पवयीन मुलांची गुन्हेगारीतील भूमिका

अल्पवयीन मुलांचा अनेक गुंड टोळय़ांकडून गंभीर गुन्हय़ांसाठी वापर केला जातो. प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांवर पाळत ठेवणे, त्याची माहिती पुरविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे अशा गुन्हय़ांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असतो. काही अल्पवयीन मुले खून, खुनाचा प्रयत्न अशा गुन्हय़ांमध्ये सामील असतात. गुन्हेगारी साम्राज्यात बस्तान बसविण्यासाठी अल्पवयीन मुले सुरुवातीला मारामाऱ्या, दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड असे गुन्हे करतात. गुन्हेगारीत नाव कमवायचे या एकाच हेतूने अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळतात. समाजमाध्यमात स्वत:ची छायाचित्रे प्रसारित करतात. मित्रांचे वाढदिवस साजरे करणे, महाविद्यालयाच्या आवारात दहशत निर्माण करणे अशा प्रकारांमध्ये बहुतांश अल्पवयीन मुले असतात, अशी माहिती गुन्हे शाखेतील वरिष्ठांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button