breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अम्फन चक्रीवादळाचा हाहाकार; पश्चिम बंगालमध्ये ७२ जणांचा मृत्यू

बुधवारी पश्चिम बंगालमध्ये आलेल्या महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले असून आतापर्यंत ७२ जणांचा बळी घेतला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चक्रीवादळाला करोना विषाणूपेक्षाही भयानक म्हटले आहे. गुरूवारी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अम्फन चक्रीवदाळामुळे पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तसेच मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना दोन लाख ५० हजार रूपयांच्या मदतीची घोषणाही यावेळी त्यांनी केली. आतापर्यंत इतकं भयानक चक्रीवादळ मी कधीही पाहिलं नव्हते, असेही त्या म्हणाल्या.  प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार यामध्ये सर्वाधिक मृत्यू झाडे पडल्यामुळे झाला आहे. ओडिशामध्येही तीन लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दोन्ही राज्यात बचाव कार्य सुरु आहे.  तसेच बांगलादेशमध्ये या चक्रीवादळामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

अम्फन चक्रीवादळाने पश्चिम बंगाल व ओडिशामध्ये हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे समुद्र किनारी भागांमध्ये वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला असून मोठं नुकसान झालं आहे. कोलकत्ताच्या अनेक भागामध्ये पाणी भरलं आहे. या वादळाचा फटका कोलकाता विमातळालाही बसला आहे. विमानतळाच्या चारही बाजूने पाणी भरलं आहे. विमानतळामध्ये प्रत्येक ठिकाणी पाणी भरलेलं आहे. विमानतळाची धावपट्टी आणि हँगर पाण्याखाली बुडाले आहेत. विमानतळाचा काही भाग तर पूर्ण पाण्याखाली गेला आहे.

पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया येथे वादळाने बुधवारी दुपारी २.३० वाजता जमिनीला स्पर्श केला, त्यानंतरच्या झंझावातात अनेक झाडे, घरे उन्मळून पडली असून विद्युत खांबही कोसळले आहेत. सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन राज्यात सुरक्षित ठिकाणी हलवले असून वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी झाला.

पश्चिम बंगालमधील दिघा येथे वादळाने भरतीच्या मोठय़ा लाटा आल्या. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊन कच्ची घरे कोसळली, झाडेही पडली आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मंगळवारी या वादळाला महावादळ संबोधण्यात आले होते पण नंतर त्याची तीव्रता थोडी कमी झाली. या वादळाने पूर्वेकडील दोन राज्यात मोठी हानी होत आहे. ओडिशात पुरी, खुर्दा, जगतसिंहपूर, कटक, केंद्रपारा, जाजपूर, गंजम, भद्रक, बालासोर येथे मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. पश्चिम बंगालमध्ये उद्या दुपापर्यंत वाऱ्याचा वेग कायम राहणार आहे. वादळाचा फटका नंतर आसाम व मेघालयालाही बसू शकतो.

चक्रीवादळामुळे उद्भवणाऱ्या स्थितीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) ४१ तुकडय़ा पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्याशी संपर्क साधला. वादळाचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने शक्य ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button