अमित ठाकरेंच्या लग्नाला जाणार का? म्हटल्यावर आदित्य ठाकरे म्हणतात….
मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरेचं लग्न २७ जानेवारीला होणार आहे. राज ठाकरे यांनी अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिकाही नुकतीच मातोश्रीवर नेऊन दिली, उद्धव ठाकरेंना लग्नाचे निमंत्रण दिले. याच लग्नाला जाणार की नाही हे आदित्य ठाकरेंना विचारताच आदित्य ठाकरे म्हटले, हो जाणारच जावंच लागणार त्यात राजकारण नाही. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे हे चुलत भाऊ आहेत. याच लग्नाला तुम्ही जाणार का असे विचारताच आदित्य ठाकरे यांनी तातडीने हो असे उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन लग्नाचे निमंत्रण दिले. या भेटीचीही चांगलीच चर्चा सोशल मीडियावर आणि प्रसारमाध्यमांमध्ये झाली. राज ठाकरे आणि शिवसेना यांच्यातला ऋणानुबंध महाराष्ट्राला ठाऊक आहे. बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख असतानाच राज ठाकरेंनी शिवसेना सोडली. मात्र त्यांनी कायमच बाळासाहेब ठाकरेंना विठ्ठल मानलं. बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती खालावलेली होती तेव्हाही राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. आता मुलाच्या लग्नाची म्हणजेच अमित ठाकरेंच्या लग्नाची पत्रिका घेऊनही राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात तासभर गप्पा रंगल्या. या भेटीची चर्चा चांगलीच झाली.