breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अबब… एक खड्डा बुजविण्यासाठी महापालिकेला १८ हजारांचा खर्च ; जेट पॅचर मशीनचा ठेक्यात गोलमाल ? 

कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड यांची माहिती 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पावसाळा सुरू होताच पिंपरी-चिंचवड शहरात खड्डे हा दरवर्षीप्रमाणे चर्चेचा विषय बनला आहे. त्यात महापालिकेने यंदापासून जेट पॅचर मशीनने खड्डे बुजविण्याच्या काढलेल्या कामात मोठा झोल झाल्याचे पुढे येत आहे. या मशीनने एक खड्डा बुजविण्यासाठी जवळपास १८ हजार रुपयांचा खर्च येत असल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या अधिकारी व ठेकेदारांसाठी शहरातील एक एक खड्डा मोठा खाऊ अड्डा ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात रस्ते विकसित करण्यासाठी व डांबरीकरणासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये स्थापत्य विभागाकडून खर्च केले जातात. तरीही दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. रस्त्यावर खड्डे पडल्यास ठेकेदारांकडून दुरुस्ती करून घेणे किंवा त्यांच्यावर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र, महापालिका प्रशासनाने ठेकेदारांना वठणीवर आणायचे सोडून महापालिका तिजोरीतून हे खड्डे बुजविण्यासाठी ८ कोटी ४० लाख रुपयांचे कंत्राट काढले. जेट पॅचर पोथॉल पॅचिंग मशिन हे नवीन तंत्रज्ञान वापरण्याबाबतची निविदा इ प्रभागाकडून २३ ऑक्टोबर ते २० नोव्हेंबर २०१७ या कालावाधीत काढण्यात आली. निविदा प्रक्रियेत पात्र ठरलेल्या मे. अंजनी लॉजिस्टिक या ठेकेदाराला ८ कोटी ३२ लाख ४१ हजार ७७२ रुपयांमध्ये हे खड्डे बुजविण्याचे कंत्राट देण्यात आले.

प्रशासनाने या कामाची मुदत ३६ महिने म्हणजे जवळपास ३ वर्षे ठेवली आहे. मात्र, प्रत्यक्षात हा ठेकेदार फक्त पावसाळ्यातील ४ महिने खड्डे बुजविण्याचे काम करणार आहे. तिन महिन्यात सुमारे  २ कोटी ८० लाख रुपयांचा खर्च या कामावर होणार आहे. मात्र,  पहिल्याच पावसाळ्यात या कामाची बोंब झाली आहे. १ जूनपासून शहरात निदर्शनास आलेल्या ४ हजार ४६५ खड्ड्यांपैकी जेट पॅचर मशीनच्या सहाय्याने फक्त ४५८ खड्डे बुजविल्याची आकडेवारी स्थापत्य विभागाने दिली. त्यामुळे शहरासाठी खड्ड्यांसाठी अवलंबविलेल्या या यंत्रणा निष्फळ ठरत असून शहराला तिचा उपयोग होत नाही. त्यामुळे वर्षाकाठी २ कोटी ८० लाखांचा खर्च का करायचा, अशा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यातच आता या कामातील मोठी गोलमाल सुरू असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे जेट पॅचर मशीनने खड्डे बुजविणे आणि त्यावर कोट्यवधींचा खर्च करणे, हे वादाच्या भोव-यात सापडले आहे.

महापालिकेने ही निविदा प्रक्रिया राबवितानाच गोलमाल केली होती. त्यानंतर कोट्यवधी खर्चाच्या या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागला आहे. त्यात विशेष म्हणजे जेट पॅचर मशीनचे काम घेणारा मे. अंजनी लॉजिस्टिक हा ठेकेदार नागपूरचा आहे. आणखी वादाची बाब म्हणजे स्थापत्य विभागाचे ही निविदा असल्याने या मशीनव्दारे बीआरटीएस रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात नसल्याचेही स्थापत्य विभागाने म्हटले आहे. मुळात खड्डे हा विषय पालिकेला त्रासदायक ठरत असताना जेट पॅचर कामातील हे गोडबंगाल आणखी वादाचे कारण ठरत आहे.

स्थापत्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत बुजविलेल्या ४५८ खड्ड्यांचा एकूण आकार ५ हजार ४८४ चौ.मी. इतका आहे. तर, जेट पॅचर मशीनचे काम देताना ठेकेदाराला चार महिन्यात प्रत्येक प्रभागातील १९०० चौ.मी. आकाराचे खड्डे बुजवायचे आहे. त्यानुसार चार महिन्यात जास्तीत जास्त १५ हजार २०० चौ.मी. आकाराचे खड्डे बुजविले जाणार आहेत. हे प्रमाण बघता चार महिन्यात जवळपास १५०० खड्डे या मशीनच्या सहाय्याने बुजविले जाऊ शकतात. त्या प्रमाणे चार महिन्यात २ कोटी ८० लाखांचा खर्च आणि १५०० खड्डे बुजविल्यास प्रति खड्डा १८ हजार रुपये इतका खर्च येत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे खड्डा बुजविण्याच्या नावाखाली पालिका तिजोरीला खड्डा पाडण्याचा डाव पालिका अधिकारी व ठेकेदारांकडून संगनमताने सुरू असल्याचे दिसते आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button