breaking-newsमनोरंजन

अपेक्षेत न ‘उतरणारी’ पण पाहण्याजोगी हिरकणी

भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने पुरुष प्रधान संस्कृती म्हणून ओळखली जाते. या पुरुष प्रधान संस्कृतीचा देशातील चित्रपट क्षेत्रावरही खोलवर परिणाम झाल्याचे दिसते. त्यामुळेच प्रदर्शित होणाऱ्या जवळपास प्रत्येक चित्रपटात अभिनेत्री आपल्याला दुह्यम भूमिका वठवताना दिसतात. चित्रपटांमध्ये अभिनेत्रींची भूमिका केवळ नायकाला प्रोत्साहन देणे किंवा हिरोबरोबर बागेत नाचकाम करणे या पलीकडे फारशी गेलेली दिसत नाही. परंतु सोनाली कुलकर्णीचा ‘हिरकणी’ हा चित्रपट या ठोकळेबाज परंपरेला छेद देणारा आहे. ‘हिरकणी’ या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक नायिका प्रधान चित्रपट आहे.

कथानक –

छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राजासाठी रायगड किल्ला उभारला होता. ४ हजार ४०० फुट उंच असलेल्या या गडावर दरवाज्यांखेरीज येण्याजाण्याचा दुसरा कोणताच मार्ग उपलब्ध नव्हता. रायगडावरुन फक्त पाणी खाली उतरु शकते व हवा वर जाऊ शकते अशी त्याकाळी रायगडाची किर्ती होती. परंतु हिरकणी रायगडाच्या या किर्तीला अपवाद ठरली. तिने आपल्या बाळासाठी १६७४ साली तब्बल २ हजार ७०० फूट खोल बुरुज उतरुन अद्भुत पराक्रम केला. या अनोख्या पराक्रमाचे कौतूक करणारी कथा व कविता आजवर आपण अनेकदा वाचली आहे. हिरकणी हा चित्रपट याच कथेवर आधारित आहे.

अभिनय –
सोनाली कुलकर्णी हिने या चित्रपटात हिरकणी ही मुख्य व्यक्तिरेखा साकारली आहे. या चित्रपटात तिने जबरदस्त अभिनयाचे प्रदर्शन केले आहे. आजवर आपण तिला ‘मितवा’, ‘क्लासमेट’, ‘पोस्टर गर्ल’ यांसारख्या शहरी कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये पाहिले आहे. परंतु हिरकणीमध्ये तिने १६व्या शतकातील शिवकालीन भाषा शिकून केलेला अभिनय नक्कीच कौतुकास्पद आहे.

सोनाली व्यतिरीक्त अमित खेडेकर याने देखील या चित्रपटात लक्षवेधी अभिनय केला आहे. अभिनयाच्या बाबतीत इतर सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका उत्तम प्रकारे वठवल्या आहे.

दिग्दर्शन –

प्रसाद ओक याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शक म्हणून त्याचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी त्याने ‘कच्चा लिंबू’ या सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या पार्श्वभूमिवर प्रसादकडून यावेळीही प्रचंड अपेक्षा होत्या. परंतु या अपेक्षा या वेळी मात्र काही अंशी पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. मध्यांतरापूर्वीचा भाग व नंतरचा भाग यात कमालीचा फरक जाणवतो. पहिल्या भागात हिरकणी या व्यक्तिरेखेला फुलवण्यासाठी प्रसादने केलेले दिग्दर्शन चांगले आहे.

हिरकणी कोण आहे? तिचा स्वभाव कसा आहे? इथपासून शिवाजी महाराजांवरील तिची भक्ती इथपर्यंत हिकरणी बाबत दिलेली माहिती खुप चांगली आहे. परंतु प्रेक्षकांना हिरकणीपेक्षा तिने केलेल्या पराक्रमात जास्त रस आहे.
हिरकणी १६७४ साली तब्बल २ हजार ७०० फूट खोल बुरुज कशी उतरली याबाबत कुतूहल होते. परंतु चित्रपट पाहताना तिच्या पराक्रमाला पुरेसा वेळ मिळाला नाही असे वाटते.

सिनेमेटोग्राफी –

हिरकणी या चित्रपटाचे चित्रिकरण उत्तम प्रकारे करण्यात आले आहे. विशेष करुन शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक व रायगड किल्ल्याची दृष्य दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत चित्रपटातील प्रत्येक फ्रेममधून दिसून येते.

स्पेशल इफेक्ट

मराठी चित्रपटांचा बजेट हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांच्या तुलनेत कमी असते. त्यामुळे मराठी चित्रपटामध्ये स्पेशल इफेक्टचा वापर फारसा केला जात नाही. परंतु हिरकणी मात्र, VFX तंत्रज्ञानाच्या वापरामुळे चर्चेत होता. अर्थात चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना पाहता स्पेशल इफेक्टची चित्रपटाला गरजही होती. परंतु वापरण्यात आलेले स्पेशल इफेक्ट फारसे प्रभावशाली नाहीत.

या व्यतिरीक्त काही लहानसहान चुका सोडल्या तर यंदा दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित होणारा ‘हिरकणी’ हा मराठी चित्रपट नक्कीच पाहण्याजोगा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button