breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

अनिष्ठ प्रथांना मूठमाती देवून विवेक अाणि ऐश्वर्या अखेर विवाहबद्ध

पिंपरी –  कौमार्य चाचणीच्या चुकीच्या प्रथेविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कंजारभाट समाजातील तरुण, तरुणीने एकमेकाच्या गळ्यात वरमाला अर्पण करत समाजातील अनिष्ठ प्रथांना मूठमाती दिली. हा क्रांतिकारी विवाह सोहळा शनिवारी पिंपरीतील काळेवाडीमध्ये पोलीस बंदोबस्तात पार पडला.

जात पंचायत , कुप्रथाविरुद्ध लढा या संस्थेच्या पुढाकाराने या विवाहसोहळ्याचे आयोजन केले होते. काळेवाडी, विजयनगर येथील बालाजी लाॅन्सवर सायंकाळी 7.10 या गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा आयोजित केला होता. गेल्या सहा महिन्यांपासून स्टॉप दि व्ही रिच्युअल अर्थात जात पंचायत , कुप्रथाविरुद्ध लढा या संस्थेने कौमार्य चाचणीविरुद्ध आवाज उठविण्यास सुरुवात केली. जातपंचायतीचे पंच आणि ज्यांना परिवर्तन नको अशांनी या तरुणांना यापूर्वी मारहाण केली.

समाजाविरुद्ध काम केल्यास वाईट परिणाम भोगावे लागतील, असे काहींनी धमकावलेसुद्धा. मात्र हाती घेतलेले कार्य तडीस न्यायचे असा मनाशी ठाम निश्चय केलेल्या विवेक आणि ऐश्वर्या यांनी बुरसट प्रथांना धुडकावून विवाह केला. किरण सत्यासिंह तमायचिकर यांचे चिरंजीव विवेक तसेच पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी महापौर कावीचंद भाट यांची नात यांच्या या विवाह सोहळ्याला समाजबांधवापेक्षा सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बँडबाजा होता, पण नातेवाईक, वऱ्हाडी मंडळी यांचा अन्य विवाहाप्रमाणे उत्साह दिसून येत नव्हता. मागील कटू अनुभव लक्षात घेता,विवाह समारंभावेळी काही घडू शकते, ही शक्यता असल्याने पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. मंगल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोलिसांचा फाैजफाटा तैनात होता. स्टेज जवळ 15 बाऊन्सरही सज्ज होते. या क्रांतिकारी विवाह सोहळ्यास विधान परिषद सदस्या डॉ नीलम गोऱ्हे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, दिग्दर्शक नागराज मंजुळे, स्टॉप दि व्ही रिच्युअल अर्थात जात पंचायत आणि कौमार्य चाचणी प्रथेविरुद्धचा लढा देणाऱ्या संघटनेचे कार्यकर्ते कृष्ण इंद्रिकर, केतन घमंडे, भारत तामयचीकर व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.  विवाह सोहळ्यानंतर जातपंचायतीच्या नेहमीच्या प्रथेनुसार कौमार्य चाचणीला सामोरे न जाता, या प्रथेला फाटा देत वधू, वर अंबरनाथ (मुंबई) ला वऱ्हाडी मंडळीसह रवाना झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button