breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

अनलॉक प्रक्रियेच्या अनुषंगानेही मुख्यमंत्र्यांनी दिल्या काही महत्त्वाच्या सूचना

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोकण आणि पुणे विभागातील करोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी अनलॉक प्रक्रियेच्या अनुषंगानेही मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाच्या सूचना संबंधितांना केल्या. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे महाराष्ट्राचा हेल्थ मॅप तयार करण्यास मदत होणार असून त्याद्वारे सुदृढ आणि निरोगी महाराष्ट्राचे निर्माण करणे शक्य होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेची राज्यभर अंमलबजावणी सुरू झाली असून स्वयंसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्य विषयक माहितीचे संकलन करत आहेत. लोकांच्या आरोग्याची माहिती घेत आहेत. यामध्ये करोना बाधित, बरे झालेले रुग्ण, त्यांची बरे झाल्यानंतरची स्थिती याबाबत माहिती संकलित केली जात आहे. लोकांना असलेल्या इतर आजारांची, त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीचीही माहिती घेतली जात आहे. या अनुषंगाने मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोकण आणि पुणे विभागाचा करोना विषयक आढावा घेतला. यावेळी त्यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले.

अनलॉक प्रक्रियेमध्ये आता दळणवळण आणि नियमित व्यवहार सुरु झाले असल्याने करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका आहे. हे लक्षात घेऊन मास्क लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात स्वच्छ ठेवणे या त्रिसुत्रीचे काटेकोर पालन करायला हवे, त्यादृष्टीने लोकांची जीवनशैली बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात यावी, मोहिमेत राज्यातील जनतेला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेऊन मोहिमेला लोकचळवळीचे स्वरूप द्यावे, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

कोकण विभागात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. करोनाला दूर ठेवून सुरक्षित राहण्यासाठी या योजनेचा निश्चित उपयोग होईल, असा विश्वासही यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. वैद्यकीय अधिकाऱ्यांना ट्रीटमेंट करताना काही अडचण येत असल्यास त्यांनी टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली. कोकण विभागात ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांमध्ये सरासरी २५ टक्के आरोग्य सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. याबाबात मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी राज्यमंत्री आदिती तटकरे यांनीही मार्गदर्शन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button