breaking-newsआंतरराष्टीय

अण्वस्त्रनिर्मूलनासाठी ‘पहिले पाऊल’!

  • उत्तर कोरियाच्या सीमाभागात जाऊन ट्रम्प यांची किम जोंग यांच्याशी चर्चा

मनमोकळ्या हास्यासह हस्तांदोलन करीत उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन व अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची दक्षिण कोरिया सीमेवरील अतिसुरक्षित निर्लष्करी क्षेत्रात रविवारी भेट झाली. दोन्ही नेत्यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्रनिर्मूलनावर चर्चा करण्याचे मान्य केले आहे. किम यांच्यासह उत्तर कोरियाच्या सीमेत चालत जाणारे ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत.

ट्रम्प यांनी सांगितले, की उत्तर कोरियाशी अण्वस्त्र निर्मूलनावर चर्चा पुन्हा होईल पण ती वेगाने होण्यापेक्षा, योग्य दिशेने होणे अपेक्षित आहे.  ओसाका येथे शनिवारी ट्रम्प यांनी एका ट्विटमध्ये असे म्हटले होते, की आता आपण दक्षिण कोरियात जात असून उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन जर सीमेवरील निर्लष्करी भागात येणार असतील तर त्यांच्याशी आपण हस्तांदोलन करू. त्यानंतर ट्रम्प दक्षिण कोरियात आले असता खरोखर किम जोंग हे दक्षिण कोरिया व उत्तर कोरिया यांच्यातील सीमेवर असलेल्या निर्लष्करी भागात आले, ट्रम्पही तेथे गेले.

अण्वस्त्रांच्या मुद्दय़ांवरून वाद असलेल्या उत्तर कोरिया व अमेरिका या देशांच्या प्रमुखांची पुन्हा एकदा ऐतिहासिक भेट झाली. याआधी दोन्ही नेत्यांची भेट व्हिएतनाम येथे फेब्रुवारीत झाली होती. ट्रम्प यांनी सांगितले, की दोन्ही देशांनी चर्चा करण्याचे मान्य केले आहे. दोन्ही देशातील राजनैतिक हालचालीत चढउतार येत आहेत. ट्रम्प यांनी किम यांना लिटल रॉकेट मॅन व बुटका जाडा माणूस म्हणून टोमणे मारले होते. उत्तर कोरियाची सीमा रेषा ओलांडताना मला अभिमान वाटला, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. दक्षिण कोरियाच्या हद्दीत पानमुनजोम या खेडय़ात फ्रीडम हाऊस या इमारतीत किम व ट्रम्प यांची चर्चा झाली. हा जगासाठी एक महान दिवस आहे,असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले.

किम जोंग उन यांनी असे सांगितले,की दुर्दैवी भूतकाळ विसरून नवे भविष्य खुले करण्यासाठी अमेरिकेची तयारी आहे, असाच संदेश यातून मिळत आहे. ट्रम्प यांनी ठरलेले नसतानाही सीमेवर येऊन भेटण्यास सांगितले, तो आश्चर्याचा धक्का होता.

पन्नास मिनिटे चर्चा

ट्रम्प यांनी शनिवारी ट्विटमध्ये असे म्हटले होते,की किम जोंग हे जर सीमेवर आले तर त्यांच्याशी भेटून हस्तांदोलन करण्याची आपली इच्छा आहे. म्हणजे ही भेट अल्पकालीन म्हणजे दोन मिनिटांची असणार होती, पण प्रत्यक्षात दोन्ही नेत्यांनी पन्नास मिनिटे खासगी चर्चा केली. ट्रम्प यांच्या समवेत त्यांच्या कन्या इव्हान्का व जावई जॅरेड कुशनर उपस्थित होते. ते दोघेही व्हाइट हाऊसचे सल्लागार आहेत.

सीमेवरून कटाक्ष!

ट्रम्प यांनी क्वेलेट येथील टेहळणी मनोऱ्यावरून उत्तर कोरियाच्या परिसरात डोकावून कटाक्ष टाकला. ट्रम्प यांनी किम यांच्या बाजूला उभे राहून दुभाषामार्फत त्यांना व्हाइट हाऊसमध्ये निमंत्रित करण्यात येईल,असे सांगितले. किम यांनीही योग्य वेळी ट्रम्प यांना उत्तर कोरिया भेटीस निमंत्रित करू, असे स्पष्ट केले.

स्थिती सुधारल्याचा ट्रम्प यांचा दावा : ट्रम्प

ट्रम्प यांनी सांगितले,की उत्तर कोरियावर र्निबध कायम राहतील, र्निबधाची तीव्रता कमी करणार नाही, असे ठरले असले तरी वाटाघाटीच्या एका विशिष्ट टप्प्यावर र्निबधांची तीव्रता कमी करता येईल. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग यांना सिंगापूर येथे गेल्यावर्षी भेटलो होतो त्या तुलनेत आता बरीच प्रगती झाली आहे. आधी परिस्थिती घातक होती, पण आता तसे  नाही. उत्तर कोरियाने अण्वस्त्रांचा हिशेब देण्याची आम्ही वाट पाहत आहोत. त्यांनी अण्वस्त्रे नष्ट करण्यास सुरूवात करावी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button