breaking-newsपिंपरी / चिंचवड

अजित पवारांच्या आदेशानंतर ठेकेदारांची थकीत बिले अदा , राष्ट्रवादीचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अनेक ठेकेदारांची सत्ताधार्‍यांनी अडवून ठेवलेली गेल्या आर्थिक वर्षांतील बिले देण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदेश दिल्यानंतर स्थायीने आज या बिलांना मान्यता दिली आहे. ही बिले मिळावीत यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी मध्यस्थी केली होती. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अजित पवार यांनी प्रशासनाला तसे आदेश दिले असले तरी याचे श्रेय राष्ट्रवादीने लाटायचे काहीच कारण नाही, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये विविध ठेकेदारांनी गत आर्थिक वर्षात शहरात 690 विकासकामे केली होती. त्यापोटी 208 कोटी 40 लाख रुपये एप्रिल महिन्यातच महापालिकेने अदा करणे अपेक्षित होते. मात्र करोनामुळे ही बिले रोखण्यात आली होती. यानंतर राज्य शासनाने 3 जून 2020 गतवर्षातील ठेकेदारांची बिले अदा करावीत, असा आदेश काढला होता. त्यानंतरही गेल्या महिनाभरापासून जाणिवपूर्वक ही बिले अदा करण्यात आली नव्हती. त्यामुळे ठेकेदारांची अडचण निर्माण झाली होती. त्यातच सत्ताधार्‍यांकडून या बिलांसाठी आर्थिक रसदीसाठी ठेकेदारांकडे तगादा लावण्यात आला होता.

हा प्रकार समोर आल्यानंतर पिंपरी-चिंचवड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बिपीन नाणेकर यांच्यासह काही ठेकेदारांनी आपली अडचण राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्याकडे मांडली होती. या प्रकरणी मध्यस्थी करत वाघेरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठेकेदारांच्या शिष्टमंडळाची भेट घडवून आणली होती. यानंतर अजित पवार यांनी ठेकेदारांची बिले अदा करण्यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना आदेश दिले होते. हे आदेश मिळताच आज (दि. 10) झालेल्या स्थायीच्या सभेत आयत्यावेळी हा विषय घेऊन मंजूर करण्यात आला.

अजित पवार यांच्या मध्यस्थीमुळे हा प्रश्न सुटल्याचा दावा संजोग वाघेरे यांनी केला असून गेल्या महिनाभरापासून आर्थिक हितसंबंधासाठी सत्ताधार्‍यांनी ठेकेदारांना जाणिवपूर्वक त्रास दिला होता. आता बिले अदा केल्यानंतर त्याचे श्रेय लाटण्याचाही प्रयत्न त्यांच्याकडून होत असल्याबद्दल वाघेरे यांनी खेद व्यक्त केला असून सत्ताधार्‍यांनी करोनाकाळात कोणालाही वेठीस न धरजा जनहिताचे निर्णय घ्यावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आदेश दिले म्हणूनच ही बिले अदा होतायत, अन्यथा ठेकेदारांची बिले कदापी मिळालीच नसती, असे कदाचित राष्ट्रवादीच्या नेत्यांना म्हणायचेय दिसते. असे असले तरी अजित पवार यांच्या आदेशाचे श्रेय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लाटण्याची प्रयत्न करू नये, असे आवाहन राजकीय जाणकार करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button