breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धर्मा पाटलांच्या गावातून “स्वाभिमानी’चे अभियान – राजू शेट्टी

पुणे – “”शेतकऱ्यांच्या आत्महत्येला केंद्र आणि राज्य सरकारचे धोरण जबाबदार आहे. शेतीमधील वाढता उत्पादन खर्च, नोटाबंदी आणि जीएसटी अशा निर्णयांमुळे शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या मनात विश्‍वासाची भावना निर्माण व्हावी, यासाठी मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकरी धर्मा पाटील यांच्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्‍यातील विखरण गावातून एक मेपासून अभियान सुरू करणार आहे,” अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात पार पडली. त्यात संघटनेची व्याप्ती वाढविण्यासोबतच भविष्यातील आंदोलनाची रणनीती आखली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शेट्टी म्हणाले, “”सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍याची भावना निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे संघटनेसमोर मोठे आव्हान आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर एक मेपासून हे अभियान सुरू करणार आहे. धुळे जिल्ह्यातून या अभियानाची सुरवात होऊन ते 9 मेपर्यंत राज्यातील 11 जिल्ह्यांत राबविण्यात येईल. “मी आत्महत्या करणार नाही, मी लढणार’, हा संदेश या अभियानातून देण्यात येणार आहे.” माजी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते, स्वाभिमानी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तूपकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण, योगेश पांडे, अनिल पवार आदी या वेळी उपस्थित होते.

खासगी विधेयके मांडणार 
येत्या जुलै महिन्यात पावसाळी अधिवेशनात लोकसभेत शेतकऱ्यांना कर्जमुक्‍ती मिळावी आणि शेती उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, अशी दोन विधेयके मांडणार आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष तसेच कॉंग्रेससह सर्व राजकीय पक्षांनी त्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन शेट्टी यांनी केले. याबाबत जनमत निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर शेतकरी संघटनांचा दबाव गट निर्माण करण्यात येत आहे. लोकसभेत ही दोन्ही खासगी विधेयके पारित करावीत, असा ठराव सर्व ग्रामसभांमध्ये मांडणार असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button