पिंपरी / चिंचवड
हॅरिस पुलाचे सद्यस्थिती सर्व्हेक्षण करणार!

पिंपरी -चिंचवड आणि पुणे शहराला जोडणा-या दापोडी येथील 121 वर्षे जुन्या ब्रिटीशकालीन हॅरिस पुलाचे सद्यस्थिती सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या सर्व्हेक्षणाबरोबरच पुलाची ना विध्वंसक चाचणीही (नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्ट) केली जाणार आहे. त्यासाठी पुणे महापालिकेमार्फत नेमलेल्या कन्सल्टंट कंपनीला पिंपरी महापालिकेमार्फत चार लाख रूपये शुल्क देण्यात येणार आहे. हे काम तातडीचे असल्याने थेट पद्धतीने करारनामा न करता देण्यात येणार आहे.
पुणे आणि पिंपरी – चिंचवड शहराला जोडणारा दापोडी येथील मुळा नदीवरील हॅरिस ब्रीज ब्रिटीशांनी सन 1895 साली बांधला. या पुलाची देखभाल आजपर्यंत पुणे महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. पुणे महापालिकेने सन 2013 साली जुन्या व नव्या पुलाच्या पुनर्वसनासाठी पुलाचा सद्यस्थिती सर्व्हेक्षणाचा अहवाल तयार करून घेतला आहे. हे सर्व्हेक्षण सी.व्ही.कांड कन्सल्टंट यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
पिंपरी: सद्यस्थितीत हॅरिस पुलास 121 वर्षे पूर्ण झाली आहेत. अद्यापही हा पुल पूर्ण क्षमतेने वापरात आहे. पुलाचे वयोमान लक्षात घेता पुणे महापालिकेमार्फत सी.व्ही.कांड कन्सल्टंट यांच्याकडून सन 2013 साली केलेल्या पुलाच्या सद्यस्थिती सर्व्हेक्षणामध्ये जुना पुल सुस्थितीत ठेवण्यासाठी उपाययोजना सुचविल्या आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
या प्रस्तावावर आयुक्तांच्या शेरांकनानुसार, पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याबाबत पुणे व पिंपरी – चिंचवड महापालिकेतील अधिकारी, अभियंता यांची 12 ऑगस्ट 2016 रोजी आयुक्त दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीत आयुक्तांनी जुना हॅरिस पुल आणि पिंपरीतील इंदीरा गांधी उड्डाणपुल यांचे स्ट्रक्चरल ऑडीट तातडीने करण्याचे आदेश दिले. आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या आदेशानुसार, सी. व्ही. कांड कन्सल्टंट यांच्याकडून ‘स्ट्रक्चरल ऑडिट’बाबत प्रस्ताव मागविण्यात आला. कांड कन्सल्टंट यांनी पत्रासोबत जुन्या हॅरिस पुलाचे सद्यस्थिती सर्व्हेक्षण करण्याबाबत प्रस्ताव दिला आहे. हॅरिस पुलाच्या तपासणीसाठी चार लाख अधिक सेवाकर इतके शुल्क त्यांनी सांगितले आहे.
हॅरिस पुलाची सद्यस्थिती सर्व्हेक्षणाबरोबरच ना विध्वंसक चाचणीही (नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्ट) केली जाणार आहे. त्यानुसार, सादर केलेल्या परिक्षण अहवालानुसार, पुलाचे पुनर्वसनाचे काम करण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी चार लाख इतका खर्च अपेक्षित आहे.
‘जेएनएनयुआरएम’ या लेखाशिर्षावरील ‘हॅरिस ब्रीज येथे उड्डाणपुल बांधणे’ या कामासाठी सन 2016-17 च्या अंदाजपत्रकात साडेसहा कोटीची तरतुद करण्यात आली आहे. हे काम तातडीचे व विशेष स्वरूपाचे असल्याने थेट पद्धतीने करारनामा न करता या क्षेत्रातील तज्ञ कन्सल्टंट सी. व्ही. कांड यांना देण्यात येणार आहे. हा विषय आगामी स्थायी समिती बैठकीत मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.