Mahaenews

पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीय सहायकाकडून महिलांचा लैंगिक छळ ?

Share On

 

पिंपरी –  महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील वरिष्ठ अधिका-यांच्या स्वीय सहायकांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांच्या विरोधात तेथील महिला कर्मचा-यांनी लैंगिक छळ केल्याबाबत महापालिका आयुक्तांकडे तक्रारी अर्ज सादर केला आहे. त्या तक्रारीची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. त्यानूसार सदरील अर्ज पालिका प्रशासनाने  वैद्यकीय विभागाकडे पाठवून संबंधित स्वीय सहायकांची चौकशी करुन अहवाल मागितला आहे. परंतू, वरिष्ठ वैद्यकीय अधिका-यांनी तक्रारी अर्ज निनावी असल्याचे कारण पुढे करीत तक्रार दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे महिलांच्या तक्रारींवर कोणाकडे न्याय मागायचा, असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे.

महापालिकेच्या वैद्यकीय  विभागातील वरिष्ट अधिका-यांचा स्वीय सहाय्यकाचा  मनमानी कारभार सुरु आहे. त्या स्वीय सहाय्यकावर अश्लील  शिवीगाळ करणे, एकटक वाईट नजरेने महिलांकडे बघत राहणे, अश्लिल चित्रफित मोबाईलवर लावून महिला कर्मचा-यांना त्यांच्या टेबलावर फाईल घेवून बोलाविणे,   कामकाज नसतानाही महिला कर्मचा-यांना ओव्हर टाईम करण्यासाठी कामावर बोलाविणे, यासह आदी गंभीर आरोप महिला कर्मचा-यांनी  तक्रारीत केले आहेत. याबाबत निनावी तक्रार आल्याचे प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त् महेशकुमार डोईफोडे यांनी वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान, सदरील तक्रार महिलांनी निनावी स्वरुपात केलेली असून ती तक्रार महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झालेली आहे. त्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी त्यांची प्रत वैद्यकीय विभागातील वरिष्ठ अधिका-यांकडे आणि  महापालिका मध्यवर्ती महिला तक्रार निवारण समितीकडे देण्यात आली आहे. परंतू, सदरील तक्रार निनावी असून शासन अध्यादेशानूसार ती दप्तरी दाखल करण्यात येईल, असा अजब खुलासा वरिष्ठ अधिका-यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

मात्र, याबाबत मध्यवती महिला तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षा पद्यश्री तळदेकर म्हणाल्या की, माझ्याकडे अजून तक्रार प्राप्त झालेली नाही. प्रशासनाने पाठविलेली  तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती तक्रार निनावी असली तरी देखील त्या तक्रारीची शहनिशा करण्याची जबाबदारी आमची आहे. त्यानूसार सदरील विभागातील महिलांचा जाबजबाब घेवून त्या तक्रारीत तथ्य असल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचा अहवाल आयुक्तांना सादर करण्यात येईल. त्यामुळे वैद्यकीय विभागातील महिलांना न्याय मिळणार का? असा प्रश्न महापालिका महिला कर्मचा-यांना पडला आहे.

Exit mobile version