शी जिनपिंग यांची पुढील वर्षी भारत भेट-मोदींनी दिले निमंत्रण

चिंगदाओ (चीन) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निमंत्रणानुसार चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे पुढील वर्षी भारतात येणार आहेत. गेल्या वर्षी या दोन नेत्यांमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेप्रमाणेच अनौपचारिक चर्चेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शी जिनपिंग यांना हे निमंत्रण दिल्याची माहिती परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी दिली आहे. मात्र या भेटीची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
एससीओ (शांधाय को-ऑप. ऑर्गनायझेशन) च्या वार्षिक परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शानडोंग प्रांतातील चिंगदाओ शहरात पोहचले आहेत. त्यांनी शी जिनपिंग यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा केली. यात वुहान परिषदेत घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. गेल्या चार वर्षात मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात झालेली ही 14 वी भेट आहे. दोन्ही देशातील पुरांची आकडेवारी पुरवणे आणि तांदळाची निर्यात सुलभ करण्यासाठीच्या दोन करारांवर आज सह्या करण्यात आल्या. पुराची आकडेवारी पुरवण्याबाबतच्या करारावर भारतीय राजदूत गौतम बंबवाले आणि चीनचे उप परराष्ट्र मंत्री कोंग शौनयू यांनी, तर तांदळाच्या निर्यातीच्या सुलभीकरणाबाबतच्या करारावर गौतम बंबवाले आणि चीनचे मंत्री नी युफेंग यांनी सह्या केल्या.