breaking-newsUncategorizedमहाराष्ट्रमुंबई

चारा छावण्यातील ‘खाबूगिरी’वर सरकारची नजर!v

छावणीतील जनावरांना ‘टॅग’ लावण्याचा निर्णय

दुष्काळी भागात जनावरांसाठी सुरू करण्यात आलेल्या चारा छावण्यांमधील जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून आतापर्यंत आठ जिल्ह्य़ांत तब्बल १३३९ छावण्या सुरू झाल्या आहेत. छावण्यांमध्ये दाखल होणाऱ्या जनावरांची संख्या फुगवून सरकारी अनुदानाचा कोणी गैरफायदा घेऊ नये यासाठी छावणीतील जनावरांना ‘जीओ टॅग’ लावण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. येत्या १५ मेपासून सर्व चारा छावण्यांमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार असून जिल्हाधिकारी थेट या छावण्यांवर नियंत्रण ठेवणार असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन विभागातील अधिकाऱ्याने दिली.

राज्यातील अहमदनगर, सातारा, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, जालना या जिल्ह्य़ांत तीव्र दुष्काळ पडला आहे. राज्य सरकारने आतापर्यंत ३१ ऑक्टोबरला १५१ तालुक्यांतील १७ हजार ९८५ गावांत, ६ नोव्हेंबर रोजी २६८ महसुली मंडळातील चार हजार २० गावांत, ८ जानेवारी रोजी ९३१ गावांत आणि २५ फेब्रुवारी रोजी चार हजार ५१८ गावे अशा २७ हजार ४५४ गावांमध्ये आतापर्यंत दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळी परिस्थितीनुसार आतापर्यंत १३३९ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या असून त्यात एक लाख लहान आणि सात लाख ९० हजार मोठी अशी आठ लाख ९३ हजार जनावरे ठेवण्यात आली आहेत. राज्यात सर्वाधिक ६०० छावण्या एकटय़ा बीड जिल्ह्य़ात असून, नगरमध्ये ४९१ छावण्या सुरू झाल्या आहेत. सरकारच्या अंदाजानुसार दुष्काळबाधित जिल्हय़ात ९६ लाख मोठी आणि ३७ लाख छोटी अशी एक कोटी ३३ लाख जनावरे असल्याने छावण्यांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

छावण्यांमध्ये दाखल होणाऱ्या जनावरांची वाढती संख्या लक्षात घेता सरकारी अनुदानाचा कोणीही गैरफायदा घेऊ नये आणि छावण्यांमध्ये कोणतीही अनियमिता होऊ नये यासाठी छावण्यांमध्ये दाखल  होणाऱ्या जनावरांना ‘जीओ टॅग’ लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी ‘कॅटल कॅम्प मॅनेजमेंट सिस्टीम’ हे मोबाइल अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे. छावणीत येणाऱ्या प्रत्येक जनावराला टॅग लावण्यात येणार असून त्यावरील बारकोडवरून जनावरांची दररोजची नोंदणी केली जाणार आहे. या नोंदीनुसारच चारा छावणी चालकांना अनुदान दिले जाणार असून येत्या १५ मेपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे  छावण्यांमधील जनावरांच्या आहारामध्ये वाढ करण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. चारा छावण्यांमध्ये दाखल मोठय़ा जनावरांना यापूर्वी दररोज १५ किलोग्रॅम हिरवा चारा, उसाचे वाडे, ऊस दिला जात होता; पण आता मोठय़ा जनावरांना दैनंदिन १८ किलो हिरवा चारा, उसाचे वाडे किंवा ऊस दिला जाईल. त्याचबरोबर लहान जनावरांना ९ किलो दैनंदिन चारा दिला जाणार आहे.

दुष्काळ संनियंत्रणासाठी वॉर रूम

राज्यातील दुष्काळी भागात सुरू असलेल्या विविध उपाययोजना तसेच चारा छावण्या, पाणीपुरवठा योजना, टॅँकरने होणारा पाणीपुरवठा यावर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयात वॉर रूम सुरू करण्याचा निर्णय मदत आणि पुनर्वसन विभागाने घेतला आहे. येत्या गुरुवारपासून ही वॉर रूम सुरू होणार असून तेथून दुष्काळी भागातील जिल्हाधिकारी, तहसीलदार यांच्याशी संपर्क साधला जाणार आहे. त्याचप्रमाणे जिल्हा यंत्रणांना आवश्यक साह्य़ करण्याचे काम या वॉर रूममधून केले जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button