शिक्षक भरती प्रक्रियेसाठी आज मोर्चा

पुणे – राज्यातील सरकारी आणि अनुदानित खासगी शाळांमध्ये शिक्षक भरतीची प्रक्रिया त्वरित सुरू करावी, यासाठी डीएड बीएड स्टुडंट असोशिएशनतर्फे सोमवार दि. 28 मे रोजी सकाळी 11 वाजता सेंट्रल बिल्डिंगमधील शिक्षण आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून उपोषण करण्यात येणार आहे. यावेळी 24 हजार पदांसाठी शिक्षक भरती झाली पाहिजे, बोगस शिक्षकांना कार्यमुक्त करा, माध्यमिक शिक्षण विभागाने संचमान्यता जाहीर करावी आदी मागण्या करण्यात येणार आहे.
यासाठी राज्यभरातून शेकडो डीएड-बीएड बेरोजगार युवक येणार आहेत. राज्यात डीएड-बीएड अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतलेले हजारो बेरोजगार युवक आहेत. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने 2012 नंतर शिक्षक भरती केलेली नाही. त्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात 24 हजार शिक्षकांची भरती करण्यात येईल, असे जाहीर केले होते. तर, शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षा आणि अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी देखील घेतली आहे.
त्यामुळे या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या परीक्षार्थ्यांना आता शिक्षक भरतीचे वेध लागले आहे. मात्र, शिक्षण विभागाकडून शिक्षक भरतीची सविस्तर माहिती अद्याप प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे या शिक्षक भरतीबाबत युवकांमध्ये अस्वस्थता आहे. दरम्यान, सोमवारी होणाऱ्या मोर्चा आणि उपोषणाची पूर्व तयारी करण्यासाठी रविवारी सायंकाळी सारसबागेत समन्वयकांची बैठक पार पडली, असे संतोष मगर यांनी सांगितले.