देशाला एकसंघ ठेवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ द्या : माजी खासदार नानासाहेब नवले

– पुनावळेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटीबद्ध- पार्थ पवार
पुनावळे ( महा ई न्यूज ) – भाजप-शिवसेना सरकारने देशातील नागरिकांना दिलेलं एकही आश्वासन पाळलेले नाही. नरेंद्र मोदींनी नागरिकांना स्वप्नं दाखवून नुसतं भुलवलं, आपल्या देशात नरेंद्र मोदीचं सरकार यावं म्हणून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे त्यांना शुभेच्छा देतोय. यातूनच लोकांनी धडा घ्यावा. देशाला एकसंघ ठेवणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करावे, असे आवाहन माजी खासदार आणि संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन नानासाहेब नवले यांनी केले.
मावळ लोकसभा मतदार संघातील काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीचे अधिकृत उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या प्रचारानिमित्त पुनावळे येथे शुक्रवारी गावभेट दौरा आयोजित केला होता. यावेळी आयोजित बैठकीत माजी खासदार नवले बोलत होते.
यावेळी पुनावळेचे माजी सरपंच लक्ष्मण मोहिते, हुशार भुजबळ, भरत काटे, सुरेश रानवडे, नगरसेवक मयूर कलाटे, युवा नेते संदीप पवार, सागर ओव्हाळ, संभाजी शिंदे, शिरीष ढवळे, अमर ताजणे, विजय काटे, सुरेश रानवडे, अनिल बांदल, किरण बोरगे, देवा मोहिते, नवनाथ मोहिते, शशी बोरगे यांच्यासह पुनावळेकर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी खासदार नवले पुढे म्हणाले की, महात्मा गांधींनी देशात रक्तहीन क्रांती करुन ब्रिटिशांना ‘चले जाव’चा नारा दिला. त्यानंतर मागील पन्नास ते साठ वर्षात काॅंग्रेसने देश प्रगतीपथावर नेला, शरद पवार साहेबांनी हा देश अन्न धान्यात स्वयंपुर्ण केला. काॅंग्रेसच्या काळात देशाच्या सरहद्दीवर इतक्या लढाया होत नव्हत्या, देशात सर्वधर्मीय लोक शांतते राहात होती. परंतू, मोदी सरकारच्या काळात अराजकता माजू लागली आहे. शत्रू राष्ट्र दररोज हद्दीचे उल्लंघन करतोय, तसेच जवान शहीद होण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच शेतक-याच्या मालाला आजही हमी भाव मिळत नाही. त्यामुळे मोदी सरकार हटविल्याशिवाय आपले जवान आणि शेतकरी टिकणार नाहीत. याशिवाय ही निवडणूक देशाची आहे. महाराष्ट्र देशाच्या राजकारणातील कणा आहे. आता मावळ लोकसभा मतदारसंघात महाआघाडीला चांगले वातावरण आहे म्हणून थांबू नका, तुम्ही गाफीलही राहू नका. असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच वारं फिरेल तसं पाठ फिरवू नका, असेही पक्ष बदलणा-यांची चांगलीच फिरकी घेत चिमटा काढला.
सागर ओव्हाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
****
पुनावळे अंडरपासचे काम मार्गी लावणार : पार्थ पवार
पुनावळे ग्रामस्थांनी गावातील काही समस्या पार्थ पवार यांच्यापुढे मांडल्या. यामध्ये पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर असलेल्या भूयारी मार्गाची उंची वाढवणे आणि रुंदीकरणाचे काम मार्गी लावण्यात येईल. तसेच, पुनावळेतील कचरा डेपोचा प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करीन, असे आश्वासन पार्थ पवार यांनी पुनावळेकरांना दिले. तसेच, पवना नदीचा नदीसुधार प्रकल्पात समावेश करुन स्वच्छ व सुंदर करावी यासाठी मी पुढाकार घेणार आहे, असेही पार्थ पवार यावेळी म्हणाले.