लष्करी अधिकाऱ्यांच्या अधिकारावर पाक निवडणूक आयोगाची मर्यादा

इस्लामाबाद – पाकिस्तानात येत्या 25 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निमीत्ताने निवडणूक आयोगाने लष्करी अधिकाऱ्यांवर काही निर्बंध लागू केले आहेत. निवडणूक केंद्रांवर तैनात केल्या जाणाऱ्या लष्करी अधिकाऱ्यांना न्यायालयीन अधिकार आहेत पण निवडणूक आयोगाने ते अधिकार आता रद्द केले आहेत. 23 जुलै ते 27 जुलै या अवधीत हे अधिकार स्थगित राहतील असा आदेश निवडणूक आयोगाने जारी केला आहे.
मतदान प्रक्रियेत होणारे संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी देशभरातील मतदान केंद्रांवर तब्बल 3 लाख 71 हजार लष्करी अधिकारी व कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. या अधिकाऱ्यांना न्यायालयीन अधिकार देण्यात आले आहेत त्याला अनेकांचा आक्षेप आहे. अनेक राजकीय पक्षांनीही निवडणूक आयोगाकडे अर्ज करून या अधिकारांना आव्हान दिले होते त्यावर निर्णय देताना आयोगाने हे अधिकार मर्यादित केले आहेत.
पाक लष्कराच्या निवडणुकीतील भूमिकेच्या विरोधात लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांनी जोरदार आक्षेप घेताना त्यांच्या विरूद्ध बदनामी करणारीही भाषा वापरली आहे त्यालाही निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला असून राजकीय नेत्यांनी अशी भाषा टाळावी अशी सूचनाही आयोगाने केली आहे. त्याचवेळी लष्करी अधिकाऱ्यांचे अधिकार मर्यादित करताना आयोगाने म्हटले आहे की मतदान केंद्रांवर कोणतेही गैरप्रकार आढळल्यास तेथे नियुक्त करण्यात आलेल्या लष्करी अधिकाऱ्यांनी प्रथम त्याविषयी तेथील निवडणूक अधिकाऱ्याला त्याची माहिती द्यावी आणि त्यानंतरच आवश्यक ती कृती करावी. लष्करी अधिकाऱ्यांनी तेथे मनमानी पद्धतीने निर्णय घेणे टाळावे अशी सुचना आयोगातर्फे करण्यात आली आहे.