Views:
667
मुंबई / महाईन्यूज
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रात चिंतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. अशा काळात राज्यातील धार्मिक, सामाजिक, राजकीय, जत्रा, यात्रा, रद्द कराव्यात अशा स्वरूपाचं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्च 1 पर्यंत राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दररोज वेगवेगळ्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा कार्यक्रमात सहभागी होत असतात. पवार यांच्यासोबत अनेक लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने गर्दी करतात. सध्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे.
राज्यात गेल्या तीन दिवसांत चार कॅबिनेट मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यात विशेष म्हणजे सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतेक मंत्री आहेत. जलसंपदामंत्री एनसीपी अध्यक्ष जयंत पाटील, अन्नधान्य पुरवठा मंत्री छगन भुजबळ, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे सर्व मंत्री विलगीकरणात असून या सर्व मंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
राज्यात मागील आठवड्यामध्ये रुग्णांची संख्या साधारण दोन हजाराच्या आसपास होती. पण रविवारी एका दिवसात जवळपास सात हजार रुग्ण नव्याने आढळले आहेत. राज्यात ठाणे, मुंबई, पुणे, अमरावती या शहरांमध्ये दिवसेंदिवस रुग्णांची संख्या अधिक आढळत असून ॲक्टिव रुग्ण देखील या शहरांमध्ये सर्वाधिक आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम 1 मार्चपर्यंत रद्द केले. त्यांच्याप्रमाणे इतर मंत्री असा निर्णय घेण्याची शक्यता देखील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दोन आठवडे जनता दरबार देखील बंद करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील मुख्यालयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचे जनता दरबार होतात, त्याला मोठ्या प्रमाणात गर्दी होते, या गर्दीमुळेदेखील सर्वाधिक धोका संभवत असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने यापूर्वीच खबरदारी घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.
Like this:
Like Loading...