breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जिजाऊ सृष्टी सिंदखेड राजा विकासकामांकरिता २५० कोटींचा निधी द्यावा

– मराठा सेवा संघाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी

– किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा

पुणे । प्रतिनिधी

जिजाऊ सृष्टी आणि जिजाऊ जन्म भूमी विकासाकरिता २५० कोटींचा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विजय घोगरे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनामध्ये केली. त्याच बरोबर गड किल्ल्यांचा विकास, मराठा योध्यांच्या स्मृती स्थळांचा विकास, शेतकरी कर्ज माफी, शेतकऱ्यांच्या गरीब मुलामुलींना मोफत शिक्षण, थकीत वीज बिल माफी, सारथी संस्थेला निधी देणे आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणे हे मुद्दे निवेदनाद्वारे मांडले.

प्रथेप्रमाणे शिवनेरी गडावर मराठा सेवा संघा तर्फे शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांची प्रमुख उपस्थिती होती.

मराठा सेवा संघाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शिवश्री विजय घोगरे म्हणाले की, सुमारे १९९६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव हिंदू कालगणना नुसार कधी फाल्गुन वद्य तृतीया तर कधी वैशाख शुद्ध द्वितीया नुसार साजरा केला जात असे. तर इंग्रजी कालगणनेनुसार कधी १९ फेब्रुवारी रोजी तर कधी ८ एप्रिल रोजी साजरा केला जात असे. त्यामुळे मराठा सेवा संघाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिवसाच्या तारखांचा शोध घेतला गेला. तेंव्हा असे लक्षात आले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म तारखेनुसार १९ फेब्रुवारी १६३० रोजी सायंकाळी किल्ले शिवनेरीवर झाला होता.

आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून सर्वप्रथम १९९६ मध्ये किल्ले शिवनेरी व पुणे शहरात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली होती. तारखेप्रमाणे होणाऱ्या शिवजयंतीचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मराठा सेवा संघा च्या प्रयत्नांमुळे सर्व जाती धर्म आणि प्रांतांचे लोक शिवजयंती उत्साहाने साजरी करतात. सध्या सुमारे साठ देशात १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी केली जाते.

या वेळी शिवमती रेखा नितीन सूर्यवंशी यांचा शिवशाही नामक काव्यसंग्रह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. मराठा सेवा संघा तर्फे नियोजन शिवश्री राजू डुबल, अध्यक्ष पुणे जिल्हा, शिवश्री रघुवीर तुपे, कार्याध्यक्ष आणि शिवश्री मंदार बुट्टे पाटील, उपाध्यक्ष जुन्नर, सूत्र संचालन शिवश्री रुपेश जगताप, अध्यक्ष जुन्नर तालुका, पाळणा कार्यक्रम नियोजन राजेन्द्र बुट्टे पाटील, माजी जुन्नर तालुका अध्यक्ष, जिजाऊ वंदना शिवमती उषाताई इंगोले व रेखा सूर्यवंशी आणि आभार प्रदर्शन शिवश्री महेश घाडगे, सचिव पुणे जिल्हा यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button