राज्यात उष्णतेच्या तीव्र लाटेची भीती

काही भागांत पावसाचेही सावट; ढगाळ वातावरणातही काहिली कायम
राज्यात सध्या मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रासह कोकण विभागातही किमान, कमाल तापमानामध्ये वाढ नोंदविली जात असल्याने उन्हाचा चटका तसेच रात्रीचा उकाडा कायम असतानाच संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये उष्णतेची तीव्र लाट येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सध्या आकाशाच्या निरभ्र स्थितीमुळे उन्हाचा चटका अधिक जाणवत असून, ढगाळ स्थिती झाल्याशिवाय या चटक्यापासून सुटका मिळणार नसल्याची सद्य:स्थिती आहे.
मार्चच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये कमाल तापमानात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. तापमानातील ही वाढ एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ातही कायम आहे. अनेक शहरांचे कमाल तापमान गेल्या आठवडय़ापासून सातत्याने ४० अंश सेल्सिअसच्या पुढे नोंदविले जात आहे. आकाशाची निरभ्र स्थिती आणि कोरडय़ा हवामानामुळे कमाल तापमानासह किमान तापमानातही वाढ होत चालली आहे. त्यामुळे दिवसा उन्हाचा चटका, तर रात्री कमालीचा उकाडा जाणवतो आहे.
सांगली, औरंगाबाद, बुलडाणा, नागपूर, वाशिम, यवतमाळ आदी भागांत कमाल तापमान ४१ अंशांच्या आसपास आहे. कोकण विभागातील मुंबईतील तापमानातही काही प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या आठवडय़ापासून ३२ अंशांवर असलेले मुंबई (कुलाबा) आणि सांताक्रुझ येथील कमाल तापमान ३२.२ अंशांवर गेले असून, ते सरासरीच्या तुलनेत सुमारे २ अंशांनी अधिक असल्याने उकाडय़ात वाढ झाली आहे.
तापभान..
राज्यात बुधवारी अमरावती येथे ४३.० अंश सेल्सिअस अशा उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ सोलापूर, चंद्रपूर, ब्रद्मपुरी या भागांमध्ये ४२.८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. नगर, मालेगाव, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, बीड, अकोला, वर्धा आदी ठिकाणी तापमानाचा पारा ४२ अंशांपुढे आहे. एकूण २२ शहरांमध्ये कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या आसपास किंवा त्याही पुढे आहे. मराठवाडा आणि विदर्भामध्ये जवळपास सर्वच ठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांपुढे आहे.
कमाल/ किमान तापमान (अंश सेल्सिअस)
मुंबई (कुलाबा) ३४.२/२४.२, सांताक्रुझ ३४.२/२३.४, अलिबाग ३२.२/२३.५, रत्नागिरी ३२.६/२३.३, पुणे ३९.९/१८.५, जळगाव ४२.६/२५.०, नगर ४२.४ /२१.०, कोल्हापूर ३९.८/२१.६,महाबळेश्वर ३५.२/१९.९, मालेगाव ४२.२/२३.६, नाशिक ३९.६/१९.६, सांगली ४०.६/१९.१, सातारा ३९.७/२०.४, सोलापूर ४२.८/२५.६, उस्मानाबाद ४२.०/–,औरंगाबाद ४०.७/२४.६, परभणी ४२.६/२३.५, नांदेड ४२.५/२४.०, बीड ४२.४/२२.८, अकोला ४२.७/२३.७, अमरावती ४३.०/२३.०, बुलडाणा ४०.६/२६.४, ब्रह्मपुरी ४२.८/२७.०,चंद्रपूर ४२.८/२७.०, गोंदिया ३९.०/२३.२,वाशिम ४१.८/२३.०, वर्धा ४२.२/२४.४ आणि यवतमाळ ४१.५/२५.४.
पावसाची शक्यता कुठे?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार ४ एप्रिलला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. ५ एप्रिलला संपूर्ण राज्यावर पावसाचे सावट असणार आहे. ६ एप्रिलला कोकणात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मात्र सर्वत्र हवामान कोरडे राहणार आहे.