मुस्लिम आमदारांचे मंत्रालयातच धरणे

- मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ नाकारल्याने नोंदविला निषेध
मुंबई – आपल्या विविध मागण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करणाऱ्या आमदारांनी आज थेट मंत्रालयाच्या पायऱ्यांवरच ठिय्या दिला. औरंगाबाद दंगली प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, एमआयएम आदी पक्षाच्या मुस्लिम आमदारांनी वेळ मागितली होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी भेटीची वेळ नाकारल्याने या पाच आमदारांनी मंत्रालयाच्या पायऱ्यांवरच तीन तास ठिय्या आंदोलन केले.
गेल्या आठवड्यात औरंगाबादमध्ये किरकोळ कारणावरून दंगल उसळली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड करत सुमारे 100 व्यापाऱ्यांची दुकाने जाळण्यात आली. त्यामुळे शहरात हिंदू-मुस्लिम अशी जातीय दंगल घडण्याची शक्यता निर्माण झाली. यासंदर्भातील काही सीसीटीव्ही फुटेजही समाज माध्यमांवर व्हायरल झाले. याचा आधार घेत हल्लेखोरांवर कारवाई करावी, या मागणीसाठी कॉंग्रेसचे आमदार आसिफ शेख, अब्दुल सत्तार, समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी, एमआयएमचे आमदार इम्तियाज जलिल, वारीस पठाण या पाच मुस्लिम आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे “वर्षा’ या शासकिय निवासस्थानी भेटीसाठी वेळ मागितली होती.
मात्र, मुख्यमंत्र्यांनी भेटण्यास वेळ दिला नाही. त्यामुळे संतापलेल्या या आमदारांनी मंत्रालयात येवून मंत्रालयातील
मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वारावरील पायरीवर ठिय्या आंदोलन केले. आमदारांच्या ठिय्या आंदोलनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच मंत्रालयात येणाऱ्या नागरीकांना अधिवेशन सुरु आहे का, असा प्रश्न पडला. त्यांना पाहण्यासाठी मंत्रालयात चांगलीच गर्दी झाली होती.
मुख्यमंत्री कार्यालयाची धावपळ…
मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ नाकारल्याने पाच मुस्लिम आमदारांनी थेट मंत्रालयातच धरणे आंदोलन केल्यानंतर प्रशासनाची चांगलीच तंतरली. मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली. त्यांनी थेट वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोनवरून आमदारांच्या आंदोलनाची माहिती दिली. त्यानंतर लगेचच या आमदारांना रात्री उशीरा चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावले असल्याचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आला. त्यानंतर या आमदारांनी आपले ठिय्या आंदोलन स्थगित केले.