मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री 3 जून रोजी गोपीनाथ गडावर

बीड : लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या चौथ्या स्मृतीदिनानिमित्त येत्या 3 जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री उमा भारती यांच्या सह अनेक मंत्री, खासदार, आमदार गोपीनाथ गडावर उपस्थितीत राहणार असून विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आली आहे. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त यावर्षीही विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानने केले आहे. समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना मदतीचा हात देण्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, शेतकरी तसेच महिला बचतगटांना सहाय्य यानिमित्ताने दिले जाते. 3 जूनला दुपारी 12 वा. गोपीनाथ गडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, खा. उदयनराजे भोसले आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी सकाळी 10 वा. ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांचे सुश्राव्य किर्तन व सर्व कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
जय्यत तयारी सुरू
स्मृतीदिनाच्या कार्यक्रमास राज्यातील अनेक मंत्री, खासदार, आमदार, भाजपसह विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच राज्याच्या विविध काना कोप-यातून मोठा जनसागर गोपीनाथ गडावर जमा होणार आहे, त्यादृष्टीने मंडप उभारणी व इतर सर्व जय्यत तयारी सध्या गोपीनाथ गडावर सुरू झाली आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.