माढ्यात राष्ट्रवादीला धक्का, शेखर गोरेंचा भाजपला जाहीर पाठिंबा

सातारा: माण तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते शेखर गोरे यांनी आज राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत आपण भाजपच्या उमेदवाराला मदत करणार असल्याची घोषणा साता-यातील पत्रकार परिषदेत केली. भाजपात सध्या तरी जाणार नाही आणि बंधू आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबतही कधीही जाणार नाही असेही गोरेंनी स्पष्ट केले. दरम्यान, शेखर गोरे यांच्या निर्णयाने माढ्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. दिवसेंदिवस आघाडीतील नेते भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याने निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
माणमधील शेखर गोरे मागील तीन-चार वर्षापासून राष्ट्रवादीत काम करत आहेत. शेखर गोरे यांनी सातारा-सांगली स्थानिक स्वराज संस्थेतून विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढविली होती. मात्र, जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घात केल्याने त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर अजित पवार यांनी त्यांची समजूत काढून भविष्यात संधी देण्याचा शब्द दिला. त्यानंतर शेखर गोरे पुन्हा माण-खटावमध्ये राष्ट्रवादीचे काम जोमाने करू लागले. २०१७ मध्ये झालेली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकतही राष्ट्रवादीला त्यांनी घवघवीत यश मिळवून दिले. म्हसवड नगर परिषदही राष्ट्रवादीला मिळवून दिली. दरम्यान, राष्ट्रवादीने तालुक्यातील भूमिपूत्र व निवृत्त झालेले सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांना पुढे आणण्याचा निर्णय घेतला. यावेळी आपल्याला विश्वासात न घेतल्याची सल शेखर गोरे यांना होती. त्यामुळे त्यांच्या मनात पक्षाबाबत काहीसी खदखद होती.
लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबियांना माढ्यातून मोहिते पाटलांना तिकीट द्यायचे नव्हते. त्यासाठी पवारांनी देशमुख यांना संधी देण्याची तयारी दाखवली. त्यानुसार देशमुख मागील सहा महिन्यापासून लोकसभेच्या तयारीला लागले होते. आपल्याला विश्वासात घेत नसल्याने गोरे- देशमुख यांच्यात छुपा संघर्ष सुरू होता. मागील महिन्यात फलटणमध्ये घेतलेल्या पक्षाच्या मेळाव्यात गोरे व त्यांच्या समर्थकांनी पवारांच्या समोरच राडा घातला. तो राडा अजित पवार यांनाही रूचला नाही. त्यामुळे अजितदादांनी शेखर गोरेंकडे दुर्लक्ष करणे पसंत केले. त्यामुळे शेखर गोरे राष्ट्रवादीत एकाकी पडत गेले.
दरम्यान, शेखर गोरे यांच्यावर मधल्या काळात अनेक गुन्हे दाखल झाले होते. मध्यंतरी त्यांच्यावर ‘मोक्का’ तर्गंत कारवाई झाली. त्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. आता शेखर गोरेंची राष्ट्रवादीतील नाराजी ओळखून भाजपने त्यांना गळ टाकला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले खास दूत श्रीकांत भारतीय यांच्या मार्फत शेखर गोरेंना संपर्क साधून माढ्यात भाजपला मदत करण्याची विनंती केली. तसेच आगामी काळात मोक्कांतर्गत गुन्ह्यातून सुटका करण्याचे आश्वासन दिल्याचे कळते. त्यामुळे गोरेंनी भाजपात न जाता माढ्यातील भाजप उमेदवार रणजित निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.