माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी करणार संघ शिक्षा वर्गात भाषण

नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गामध्ये भाषण करणार आहेत. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार यांनी ही माहिती दिली.
संघाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आणि नवनियुक्त कार्यकर्त्यांसमोर भाषण करण्याचे मुखर्जी यांनी मान्य केले आहे. संघाच्या प्रथेनुसार नागपूर इथे होणाऱ्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या प्रकट समारोपाला मुखर्जी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. रेशीमबाग या मुख्यालयाच्या मैदानावर होणाऱ्या संघ शिक्षा वर्षाच्या समारोपाच्या प्रकट समारंभाला नेहमी मान्यवर व्यक्तींना निमंत्रित केले जात असते. त्यानुसार माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रित करण्यात आले आहे आणि त्यांनी संघाचे निमंत्रण स्वीकारले आहे, असे अरुण कुमार यांनी सांगितले.
या वर्षाच्या प्रारंभी मुखर्जी यांनी संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना प्रणव मुखर्जी फौंडेशनच्या उद्घाटनाच्या समारंभाला निमंत्रित केले होते. मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकालाच्या अखेरच्या काळात सरसंघचालक मोहन भागवत यांनी दूरध्वनीवरून चर्चाही केली होती. तर मुखर्जी यांनीही भागवत यांना राष्ट्रपती भवनामध्ये भोजनासाठी निमंत्रित केले होते.