भारतीय अर्थव्यवस्था योग्य मार्गावर – भारतीय उद्योग महासंघाचे प्रतिपादन

नवी दिल्ली – मोदी सरकारला उद्या चार वर्ष पुर्ण होत आहेत. यानिमीत्ताने भारतीय उद्योग महासंघाने देशातील अर्थिक स्थितीबाबतचे विवेचन आज प्रसिद्धीला दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की देशातील आर्थिक सुधारणांचा वेग समाधानकारक असून देशाची मुलभूत आर्थिक चौकट मजबूत आहे आणि त्या आधारावर देश योग्य मार्गावर वाटचाल करीत आहे.
या महासंघाचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी या संबंधात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या चार वर्षात सरकारने अर्थव्यवस्थेतील सर्व महत्वाचे विषय व्यवस्थीतरित्या हाताळले आहेत. बॅंकांचे बुडित कर्ज, ईज ऑफ डुईंग बिझनेस, थेट विदेशी गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि बंद पडत चाललेले उद्योग या सर्व विषयांची सरकारने चांगली हाताळणी केली आहे. त्यामुळे देशातील बिझनेसचे वातावरण सुधारत आहे.
गुंतवणुकीला चालना मिळत आहे. त्यातून आर्थिक विकासाला गती मिळत आहे. जीएसटी अंमलबजावणीचा विषयही आता चांगला मार्गी लागला आहे असेही त्यांनी नमूद केले आहे. या आर्थिक सुधारणांमुळे पुढील वर्षी आर्थिक स्थितीला खऱ्या अर्थाने गती मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.