बीसीसीआयने कसोटी क्रिकेटकडे दुर्लक्ष केलं – गौतम गंभीर

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय हे कसोटी क्रिकेटकडे दुलर्क्ष करत असल्याची टीका भारताचा सलामीवीर गौतम गंभीर याने केली आहे. क्रिकेटमधील जाणकार बोरिया मजुमदार यांच्या “इलेव्हन गॉड अँड बिलियन इंडियन्स’ या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या वेळी गंभीरने ही टीका केली. बीसीसीआयने ज्या पद्धतीने एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटची जाहिरातबाजी केली, त्याची प्रसिद्धी केली, त्या प्रमाणात कसोटी क्रिकेटची प्रसिद्धी केली नाही. म्हणून अद्याप भारतात कसोटी क्रिकेटला सोनेरी दिवस आलेले नाहीत, असा आरोप गंभीरने केला.
तो म्हणाला की बीसीसीआयने कसोटी क्रिकेटकडे म्हणावे तसे लक्ष पुरवले नाही. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटची प्रसिद्धी करताना बीसीसीआयने सर्व प्रकारच्या क्लुक्त्या वापरल्या. त्यांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आणि या दोन्ही प्रकारच्या क्रिकेटला चांगले वलय मिळवून दिले. पण त्यामुळे कसोटी क्रिकेट मात्र दुलर्क्षित राहिले. याबाबत बोलताना त्याने एक किस्सा सांगितला. विंडीजविरुद्ध 2011 साली ईडन गार्डन्सवर कसोटी सामना रंगला होता. त्यावेळी सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण यासारखे मातब्बर खेळाडू मैदानात होते. मात्र त्या सामन्याला पहिल्या दिवशी केवळ 1000 लोक सामना पाहायला आले होते, ही खंत अजूनही मनात आहे, असे गंभीर म्हणाला.