बारावीच्या पारितोषिकांमध्येही पुण्याचाच झेंडा !!!

- बोर्डाकडून बारावीच्या पारितोषिकांची यादी जाहीर
नारायणगाव येथील मयुरी लुनियाला पाच पारितोषिके
पुणे – राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेत पुणे विभागीय मंडळात विविध विषयांत बाजी मारलेल्या विद्यार्थ्यांना पुणे विभागीय शिक्षण मंडळाच्या माध्यमातून अनेक देणगीदारांतर्फे पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. निकालाप्रमाणेच पारितोषिकांमध्येही पुणे जिल्ह्यानेच बाजी मारली असून एकूण 25 पैकी 18 पारितोषिके पुण्याच्या नावावर आहेत.
काहीच दिवसांपूर्वी इयत्ता बारावीचा निकाल ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. या विद्यार्थ्यांना 12 जून रोजी मुळ गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे. या जाहीर झालेल्या पारितोषिकांमध्ये 25 पैकी 18 पारितोषिके ही पुणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळाली आहेत तर पाच पारितोषिके ही अहमदनगरच्या नावावर आहेत तसेच दोन पारितोषिके ही जळगाव येथील शेगावमधील विद्यार्थ्यांच्या नावावर आहेत. यंदा देण्यात आलेल्या 25 रोख स्वरुपातील पारितोषिकांमध्ये जुन्नर तालुक्यातील मयुरी लुनिया या विद्यार्थिनीला गणित विषयात विभागात प्रथम आल्याबद्दल पाच पारितोषिके देण्यात आली आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांना एकाच विषयासाठी दोन वेगवेगळी पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत.