प्लास्टिकबंदीमुळे राज्यातील उद्योगांवर आर्थिक तोट्याचे संकट

पुणे : राज्यातील प्लास्टिकबंदीमुळे अनेक उद्योगांवर आर्थिक तोट्याचे सावट निर्माण झाले आहे. सरकारने कुठलाही विचार न करता सरसकट बंदी अचानक लागू केल्यामुळे द्राक्ष उद्योगासारख्या अनेक उद्योगांवर दबाव आला आहे, असे पुणे ग्रेप ग्रोवर असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सोपान कांचन यांनी म्हटले आहे. सरकारने उत्पादक, वैज्ञानिक व व्यापारी यांच्याशी एकत्र चर्चा करून सुस्पष्ट अंमलबजावणी धोरण तयार केले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कांचन म्हणाले की, ‘राज्यात तीन महिन्यांनंतर प्लास्टिकबंदी पूर्णतः लागू झाल्यानंतर फळे प्रक्रिया उद्योगांत वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या (पीईटी बाटल्या) वापरणेदेखील बंद करावे लागण्याची चिन्हे आहेत. या संभाव्य बंदीमुळे राज्यातील आंबे, संत्री, पेरू, स्ट्रॉबेरीज व द्राक्षे या फळ उद्योगावर मोठा आर्थिक तोटा सहन करण्याची वेळ येईल. पीईटी बाटल्यांवर बंदी आणली, तर अंतिम उत्पादनावर परिणाम होईल. द्राक्षांचा रस व मद्ये यांची पीईटी बाटल्यांमधूनच विक्री केली जाते. प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्याऐवजी पुनर्चक्रण प्रक्रियांचा अवलंब करणे गरजेचे आहे.’ सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असेही त्यांनी सांगितले.