पेट्रोल, डिजेल दरवाढ म्हणजे भाजपची संघटीत सरकारी लुट – मारुती भापकर

पिंपरी – महागाई व बेरोजगारीमुळे सर्वसामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले असताना केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिजेल दरवाढ केली आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढ म्हणजे भाजपची संघटीत सरकारी लुट असल्याची टिका करत माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी पेट्रोल व डिजेल दरवाढीचा जाहिर निषेध केला आहे.
यासंदर्भात भापकर यांनी प्रसिध्दीपत्रक दिले आहे. त्यात म्हटले आहे की, सप्टेंबर २०१३ मध्ये अंतरराष्टीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रतीबॅरल १०९.४५ डॉलर अशी होती. त्यावेळी पेट्रोलचे दर प्रती लिटर दिल्लीमध्ये ७६ रुपये ०६ पैसे, कोलकत्ता येथे ८३ रुपये ६३ पैसे आणि मुंबई पुणे ८३ रुपये ६२ पैसे असे एक लिटर पेट्रोलचे भाव होते. त्यावेळी तत्कालीन सरकार विरोधात भाजपचे सर्व नेते कार्यकर्त्यांनी आकाश पातळ एक करून थयथयाट केला होता.
ऑक्टोंबर २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाची किमंत प्रतीबॅरल ५५ डॉलर अशी असताना दिल्लीमध्ये ७१ रुपये, कोलकत्यामध्ये ७३ रुपये आणि मुंबई-पुणे ८० रुपये असा पेट्रोलचा एक लिटरसाठी भाव होता. गेल्या आठ दिवसांत पेट्रोलचे (प्रती लिटर) ८ रुपयाने दरवाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल प्र.ली. ८५.५१ रुपये आणि डिजेल प्र.ली. ७२ रुपये असे दर आहेत. खरे तर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्या तेलाचे कमी झालेले दर पहाता आज पेट्रोल ४० रुपये लिटरने ग्राहकांना मिळायला हवे. मात्र, भाजप सरकारने पेट्रोल आणि डिजेलची दरवाढ केली आहे. ही दरवाढ म्हणजे भाजपची संघटीत सरकारी लूट असल्याची टिका करत या दरवाढीचा भापकर यांनी निषेध केला आहे.