पुणेकरांचा पावसाळा जाणार सुकर

- खोदाई केलेल्या रस्त्यांची 90 टक्के दुरुस्ती पूर्ण
पुणे : शहरात मोबाईल कंपन्या तसेच महावितरणकडून करण्यात आलेल्या रस्ते खोदाईच्या कामानंतर हे रस्ते पूर्ववत करण्याचे 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. महापालिकेच्या पथ विभागाने 2 मेपासून हे खोदाई केलेले रस्ते दुरूस्त करण्याचे काम हाती घेतले होते. हे उर्वरीत कामही पुढील काही दिवसांत पूर्ण केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूध्द पावसकर यांनी दिली.
महापालिकेकडून शहरात दरवर्षी ऑक्टोबर ते 30 एप्रिल या कालावधीत मोबाईल कंपन्या, महावितरण, तसेच एमएनजीएलला गॅस वाहिनी टाकण्यासाठी खोदाईस परवानगी दिली जाते. या खोदाईनंतर महापालिकेकडून हे रस्ते पुन्हा पूर्ववत केले जातात. त्यासाठी पथ विभागाकडून या कंपन्यांकडून खोदाई व दुरुस्ती शुल्क आकारले जाते. पथ विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 30 एप्रिल 2018 पर्यंत जिओ कंपनीने 150 किलोमीटर, एमएनजीएल कंपनीने 73 किलोमीटर, तर महावितरणकडून 30 किलोमीटर अशी एकूण 183 किलोमीटरची खोदाई करण्यात आली होती. त्यातील 172 किलोमीटरचे रस्ते डांबरीकरण तसेच गरज असेल तिथे कॉंक्रीटीकरण करून पूर्ववत करण्यात आले आहेत.
या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पावसकर यांनी नुकतीच पथ विभागाच्या अभियंत्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली आहे. तसेच उर्वरीत रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम पुढील तीन ते चार दिवसांत पूर्ण केले जाईल, असेही पावसकर यांनी या बैठकीबाबत बोलताना स्पष्ट केले.
वेळेत दुरुस्तीने पुणेकरांचा पावसाळा सुकर
गेल्या काही वर्षांत शहरात मोबाईल कंपन्यांकडून ऑप्टीक फायबर केबल टाकण्यासाठी बेसुमार रस्ते खोदाई करण्यात आली होती. मात्र, त्या तुलनेत पथ विभागाकडून पावसाळ्यातही रस्ते दुरुस्तीचे काम केले जात होते; तर महापालिका 30 एप्रिल रोजीच खोदाई बंद करते. मात्र, एमएनजीएल तसेच कही मोबाईल कंपन्यांकडून राजकीय वजन वापरून 15 ते 31 मेपर्यंत खोदाईची परवानगी मिळविली जात होती. त्यामुळे या खराब रस्त्यांचा पुणेकरांना पावसाळ्यात सामना करावा लागत होता. मात्र, यंदा पावसाळ्यापूर्वीच ही दुरुस्तीची कामे पूर्ण झालेल्या पुणेकरांचा पावसाळा सूकर जाण्याची चिन्हे आहेत.