पिंपळे सौदागरमध्ये प्लॅस्टिक बॅग्ज वापराला बंदी

पिंपरी: प्लॅस्टिक पिशव्यांचा वाढता वापर आणि त्यातून पर्यावरणाला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन पिंपळे सौदागरचे नगरसेवक विठ्ठल काटे यांनी प्लॅस्टिक बॅग्ज हा उपक्रम हाती घेतला आहे. उद्या, गुरुवार दि. 15 तारखेपासून उपक्रमाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
प्रभागातील व्यावसायिकांना त्यांनी प्लॅस्टिक पिशव्या न देण्याच्या सूचना केल्या आहेत. प्लॅस्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. या उपक्रमातून आपला परिसर स्वच्छ आणि हरित राहण्यास मदत होईल, अशा भावना त्यांनी मांडल्या आहेत.
याबाबत काटे म्हणाले, आज पिंपळे सौदागरमधील लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तेथील व्यावसायिकांची संख्याही मोठी आहे. त्यांच्याकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर होतो. त्यातून पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. ही हानी टाळण्यासाठी तसेच, त्याची तीव्रता कमी करण्याच्या दृष्टीने आम्ही प्लॅस्टिक पिशवी विरोधी मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत प्लॅस्टिक पिशवी वापरण्यावर बंदी घातली आहे. नव्हे, तर व्हॉट्सऍपच्या माध्यमातून सर्व नागरिकांनाही आवाहन केले आहे.
कापडी पिशव्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी आठवडी बाजारामधून आतापर्यंत 25 हजार पिशव्यांचे वाटप केले आहे. जोपर्यंत आपण त्यावर व्यावसायिकांच्या माध्यमातून बंदी घालत नाही, तोपर्यंत प्लॅस्टिकचा वापर थांबणार नाही. ही बाब लक्षात आल्यानेच आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे.