नियंत्रण रेषेवर 5,500 बंकर उभारणार

श्रीनगर – नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभुमीवर नियंत्रण रेषेनजीकच्या गावांमध्ये नागरिकांच्या रक्षणासाठी तब्बल 5,500 बंकरची उभारणी केली जाणार आहे. तसेच 200 सीमा भवन बांधण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 153.60 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालय आणि जम्मू-काश्मीर सरकार हा उपक्रम राबवत आहे.
पाकिस्तानकडूृन नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामुळे या भागातील अनेक गावांतील नागरिकांना जीव मुठीत घेऊन राहावे लागत आहे. बऱ्याचदा या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले जाते. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी सरकारने बंकर उभारणीचा निर्णय घेतला आहे.
सध्या नियंत्रण रेषेवर 120 कि. मी. अंतरावर 5,196 बंकरची उभारणी करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सुंदरबानी, क्वीला, द्राल, नौशेरा, दुंगी, रौजोरी, पंजगन आणि मनाजकोट आदी भागांचा समावेश आहे. यामध्ये कुुटुंब राहण्यासाठीही स्वतंत्र बंकरचा समावेश आहे. या भागातील सीमा भवनात 10 हजार नागरिक सामावतील इतकी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक कुटुंबाला ते राहत असलेल्या सध्याच्या घरापासून 0 ते 3 कि. मी. अंतरापर्यंत ही बंकर उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच शाळा, रुग्णालये, पोलिस ठाणे, सरकारी कार्यालयेही या बंकरपासून नजीक असतील याचा यामध्ये विचार करण्यात आला आहे.