च-होलीतील भामा आसखेड जलवाहिनीचे काम तातडीने पूर्ण करा – महेश लांडगे

पुणे महापालिकेच्या अधिका-यांना बैठकीत दिल्या सूचना
पिंपरी – पुणे महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांनी दुर्लक्ष केल्यामुळे भामा आसखेड पाईपलाईनचे काम संथगतीने सुरु आहे. ठेकेदाराने जलवाहिनीसाठी रस्ते खोदले आहेत. त्याचा च-होलीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजे. अन्यथा संबंधित अधिका-यांवर कारवाई करण्यात यावी, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी पुणे महापालिका प्रशासनाला केली.
राज्य सरकारने पुणे महापालिकेला भामा-आसखेड धरणातून पाणी उचलण्यास परवानगी दिली आहे. त्याकरिता वाघोली येथे जलशुद्धीकरण बांधण्याचे पुणे महापालिकेचे नियोजन आहे. ही पाईपलाईन टाकण्याचे काम खेड तालुक्यातील विविध ग्रामपंचायती, आळंदी नगरपरिषद व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीमधून केले जात आहे. यापैकी पुणे-आळंदी रस्त्यावरील पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर च-होलीगावच्या हद्दीत हे काम सुरु आहे. मात्र, गेली दोन वर्षांपासून हे काम संथगतीने सुरु आहे. रस्ता खोदल्याने अनके अपघात झाले आहेत. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी आज गुरुवारी (दि. 24) पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिका-यांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीला ‘इ’ प्रभाग अध्यक्षा भीमाबाई फुगे, पिंपरी पालिकेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त प्रवीण आष्टीकर, पुणे पालिकेचे अधीक्षक अभियंता प्रवीण गेडाम, पिंपरी पालिकेचे कार्यकारी अभियंता जीवन गायकवाड, नगरसेवक राहुल जाधव तसेच संबंधित ठेकेदार उपस्थित होते.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, या कामासाठी अनेक ठिकाणच्या जागांचा ताबा पुणे महापालिकेकडे नाही. मात्र, पिंपरी-चिंचवड महापालिकेने या कामासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. तरीदेखील हे काम गेल्या दोन महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरु आहे. पुणे महापालिकेचा एकही जबाबदार अधिकारी या कामाकडे फिरकत देखील नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून या कामात दिरंगाई होत आहे. अधिका-यांनी लक्ष घालून जलवाहनीचे च-होली येथे सुरू असलेले काम पुर्ण करावे. अन्यथा कामचुकार अधिका-यावर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना लांडगे यांनी दिल्या.