‘चौकीदाराची झालीय झोपमोड म्हणून काढत आहेत पवारांची खोड’

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, (ता.१२) अहमदनगर येथील प्रचार सभेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. ”अहो, शरदराव…तुम्ही तुमच्या पक्षाचे नाव राष्ट्रवादी जनतेची धूळफेक करण्यासाठी ठेवले आहे का? अशा शब्दांत मोदी यांनी शरद पवारांना लक्ष्य केले. यावर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदींच्यावर सोशल मीडियाचा आधार घेत पलटवार केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. वर्धा येथील सभेत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावेळी देखील धनंजय मुंडे यांनी मोदींच्या टीकेला सोशल मीडियावरुन उत्तर दिले होते. अहमदनगरमधील सभेत मोदी यांनी शरद पवार यांच्यावरील टीकेला धनंजय मुंडे यांनी ट्वीटच्यामाध्यमातून उत्तर दिले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की,” चौकीदाराची झालीय झोपमोड म्हणून प्रत्येक सभेत काढत आहेत पवार साहेबांची खोड. मोदीजी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या नसानसात ‘राष्ट्रवाद’ आहे. तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाही. आम्हाला नावं ठेवण्याआधी भाजपाची तुम्ही भारतीय मोदी पार्टी केली त्याचं काय ते बघा”.
यासोबतच धनंजय मुंडे यांनी दुसरे ट्वीट केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, ”मोदींना शहीद जवानांच्या नावे मतं मागताना लाज वाटत नाही का? जवानांच्या कर्तृत्वाचे, धैर्याचे, बलिदानाचे असे राजकीय भांडवल करणारा पंतप्रधान मी याआधी कधीच पाहिला नाही. तुमच्या ५६ इंची छातीत दम असेल तर तुम्ही केलेल्या कामावर मतं मागा, शहीद जवानांच्या आणि टीकेच्या कुबड्या घेऊन नाही.”
अमहदनगरच्या सभेत मोदी म्हणाले होते की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशा लोकांच्या बरोबर उभे आहेत. जे जम्मू- काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याचे सांगत आहेत. ज्यांना काश्मीरमध्ये वेगळा पंतप्रधान हवा आहे. मला काँग्रेसकडून कोणतीही आशा नाही. मात्र, शऱद पवार यावर गप्प का आहेत. एकीकडे पाण्यासाठी महायुती सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस सरकारचे घोटाळे आणि अजित पवार यांचे लज्जास्पद वक्तव्य आहे.