चीनमधील अमेरिकन अधिकाऱ्यांना विचित्र आजाराची लागण

वॉशिंग्टन (अमेरिका) – चीनमध्ये नियुक्ती झालेल्या अनेक अमेरिकन अधिकाऱ्यांना एका विचित्र आजाराची लागण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. ग्वांगझू येथील अमेरिकन वाणिज्य दूतावासातील अनेक कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांना या आजाराची लागण झालेली आहे. विचित्र आवाज ऐकल्यानंतर या आजाराची लक्षणे दिसू लागल्याची तक्रार त्यांनी केली आहे. मेंदूवर आघात झाल्यासारखी ही लक्षणे आहेत. या प्रकारावरून अमेरिका आणि चीन यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता आहे.
23 मे रोजी प्रथम एका अधिकाऱ्याने या विचित्र आजाराची तक्रार केली होती. त्यानंतर डॉक्टरांची एक टीम तपासंणीसाठी चीनमध्ये पाठवण्यात आली. प्राथमिक तपासणीनंतर अनेक अमेरिकनांना स्वदेशी पाठवाण्यात आले होते. अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी सावधगिरीच्या सूचना जारी केल्या आहेत.
अमेरिकन नागरिकांनी विचित्र आवाज ऐकू आल्याबद्दल जी तक्रार केली आहे, त्याबाबत काहीही निष्पन्न झाले नसल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. मात्र हा आजार एखाद्या गुप्त हल्ल्याचा परिणाम असू शकता. एखाद्या विषारी पदार्थाचा वा आवाजाच्या उपकरणाचा वापर केला असण्याची शंका अमेरिकन माध्यमांनी व्यक्त केली आहे.
ग्वांगझू दूतावासत 170 अमेरिकन नागरिक आहेत.