गोंदियामध्ये धरणात बुडून दोन बालकांचा मृत्यू

गोंदिया: देवरी येथून सुमारे वीस किलोमीटरवर असलेल्या ओवारा धरणात बुडून एका मुलाचा आणि मुलीचा मृत्यू झाला. तर बुडणाऱ्या दोन मुलींना वाचवण्यात ग्रामस्थांना यश आले. आज सकाळी साडेअकराच्या सुमारास ही घटना घडली.
शुभम रामचंद्र मोरदेवे आणि अश्विनी भोजराज मेश्राम अशी मृतांची नावे आहेत. तर विश्वेश्वरी परतेती आणि रोशनी मोरदेवे यांना स्थानिकांनी वाचवले. मिळालेल्या माहितीनुसार शुभम, अश्विनी, रोशनी आणि विश्वेश्वरी हे चौघेही आज सकाळी ओवारा धरणावर अंघोळीसाठी गेले होते. पाण्यात उतरल्यानंतर खोलीचा अंदाज न आल्याने ते चौघेही बुडू लागले. जवळच धुणी धुणाऱ्या महिलांनी त्यांना बुडताना पाहिले आणि आरडाओरड सुरू केली. ते ऐकून ग्रामस्थांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. विश्वेश्वरी आणि रोशनी या दोघींना त्यांनी वाचवले. मात्र, शर्थीच्या प्रयत्नानंतरही शुभम आणि अश्विनीला ते वाचवू शकले नाहीत.